Saturday, July 5, 2025

प्रयोगशील रंगकर्मीचा नाबाद प्रयोग क्रमांक ८०...

प्रयोगशील रंगकर्मीचा नाबाद प्रयोग क्रमांक ८०...

राजरंग : राज चिंचणकर 


प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर रंगकर्मी विविध प्रयोग करतच असतात; पण त्याही पलीकडे जाऊन नाट्याची कास धरत काही उपक्रम करण्यातही अनेकजण पुढाकार घेत असतात. असा एखादा उपक्रम हाती घेतला की त्यात सातत्य ठेवावे लागते; मात्र अनेकजणांच्या अशा उपक्रमांवर काही दिवसांतच पडदा पडतो, पण काही रंगकर्मी असे असतात की एकीकडे रंगभूमीवर नाटक करत असतानाही वेळ काढून एखादा उपक्रम राबवतात आणि पुढे अखंड सुरू ठेवतात. अशाच एका प्रयोगशील रंगकर्मींचा एक वेगळा प्रयोग म्हणजे ‘चला, वाचू या’ आणि तो सक्षमतेने सादर करत राहणारा रंगकर्मी म्हणजे श्रीनिवास नार्वेकर! आतापर्यंत रंगभूमीवर विविध नाटकांच्या माध्यमातून, अभिनयासह दिग्दर्शनाची धुरा वाहणाऱ्या या रंगकर्मीचा हाच उपक्रम दशकपूर्ती वर्षासह आता थेट ८० व्या प्रयोगापर्यंत येऊन ठेपला आहे.


सातत्याने नव्या संकल्पनांचा मागोवा घेत, त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी झटणाऱ्या या रंगकर्मीचे प्रयत्न आणि त्याची साहित्यप्रेमी लेखिका पत्नी डॉ. उत्कर्षा बिर्जेची साथ, यातून हा उपक्रम सुरू झाला. तब्बल १० वर्षे दर महिन्याला एखादा विनामूल्य उपक्रम चळवळ स्वरूपात चालवणे हे सोपे नाही. विशेष म्हणजे, कुठल्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न करता स्वतःचा खिसा रिकामा करत कुठलीही चळवळ सुरू ठेवणे हे तसे कठीण काम आहे. श्रीनिवास नार्वेकर याने जून २०१५ मध्ये ‘व्हिजन’ या त्याच्या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे तत्कालीन प्रकल्प संचालक आशुतोष घोरपडे यांच्या सहकार्याने या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. अल्पावधीतच एका छोट्या रोपट्याचे म्हणता म्हणता वृक्षात रूपांतर झाले. मुंबईत पाया रचलेल्या या उपक्रमाने रश्मिता व राजेश शहापूरकर, तसेच डॉ. शेखर कुलकर्णी यांच्या निस्वार्थी पुढाकाराने पुणे मुक्कामीही जोर धरला. हे सर्व करताना श्रीनिवास नार्वेकरला विविध अडचणींना सामोरे जावे लागले, पण त्यावर मात करत हा उपक्रम सुरू ठेवण्याचे कार्य तो मनापासून करत आहे.


महत्त्वाचे म्हणजे कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीतही यात खंड पडला नाही. या काळात सलग ८ दिवस अभिवाचन अष्टकासह ऑनलाईन प्रयोग झाले आणि त्यात अनेक नामवंतांनी सहभाग घेतला. कोरोनानंतरच्या काळात कुर्ला येथे एका छोटेखानी रंगमंचावरही श्रीनिवास नार्वेकर याने हा उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोरोनाच्या नंतर लोकांचे जीवनमानच बदलले गेले. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमासाठी दूरवर जाण्याची रसिकांची सवय मोडली होती. साहजिकच त्याचा या उपक्रमाला फटका बसला. पण याच रंगमंचावर आयोजित केलेल्या ‘चला, वाचू या’च्या ७५ व्या प्रयोगाला मात्र रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या मंडळींचा हुरूप पुन्हा एकदा वाढला. आतापर्यंत या उपक्रमाचे ७९ प्रयोग झाले असून, त्यात १०० हून अधिक संस्था, ३०० हून अधिक नामवंत आणि नवोदित कलावंतांनी सहभाग घेतला आहे. आता याच उपक्रमाचा नाबाद प्रयोग क्रमांक ८० लवकरच सादर होणार आहे.


या प्रयोगांविषयी बोलताना श्रीनिवास नार्वेकर त्याची भूमिका स्पष्ट करताना म्हणतो, “रसिकांना पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये आयोजित होणाऱ्या या उपक्रमाची सवय झाली होती. आता कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर पुन्हा एकदा याच वास्तूमध्ये या उपक्रमाची सुरुवात करायची ठरवले आहे. या उपक्रमाचा दशकपूर्ती सोहळा आणि ८० वे पुष्प लवकरच साजरे करण्यात येईल. या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधले साहित्य रसिकांसमोर आले आणि त्यातून वाचन संस्कृतीची एक चळवळ उभी राहिली. अभिवाचनासाठी सातत्याने दर महिन्याला होणारी ‘चला, वाचू या’ ही मुंबईतली पहिली आणि एकमेव वाचन चळवळ आहे. या उपक्रमामध्ये सहभागी झालेले अभिवाचक कलावंत व संस्था यांचा या चळवळीच्या यशामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. आम्ही फक्त एक माध्यम आहोत, अशी माझी नेहमीच धारणा राहिलेली आहे. रसिकजन आणि सहभागी अभिवाचक यांच्या बळावरच इतकी वर्षे हा उपक्रम आम्ही करू शकलो आहोत”.

Comments
Add Comment