
नवी दिल्ली: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) एक आठवडा पूर्ण केला आहे. यादरम्यान आयएसएसवरून पृथ्वीला पाहणे खूप रोमांचक असल्याचे त्यांनी वर्णन केले. याबरोबरच त्यांनी आणखीन एक विक्रम रचला आहे. तो म्हणजे ते सर्वात जास्त काळ आयएसएसमध्ये राहणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. यादरम्यान, शुभांशू शुक्ला यांनी आपले काही अनुभव शेअर केले आहेत. त्यांना अंतराळात एक दिवसाची सुट्टी मिळाली असून, या सुट्टीमध्ये त्यांना व्हँटेज पॉइंटवरून पृथ्वी पाहायला प्रचंड आवडत असल्याचे त्यांनी सांगितले. अंतराळातून पृथ्वीची जी विहंगम दृश्य दिसतात ती जमिनीवरून अजिबात दिसणार नाही. असे त्यांनी सांगितले.
एक दिवसाच्या सुट्टीमध्ये शुभांशू शुक्ला यांनी कुटुंब भारतीयांशी साधला संवाद
एका आठवड्यानंतर, त्यांना एक दिवस सुट्टी मिळाली. त्यांनी हा दिवस त्यांच्या कुटुंब आणि देशवासीयांशी संपर्क साधून आणि त्यांचे अनुभव शेअर करून घालवला. यादरम्यान त्यांनी भारतीय तसेच विविध देशातील पदार्थांचा आस्वाद घेतल्याचे देखील सांगितले.
शुक्रवारी शुभांशूने हॅम रेडिओद्वारे आयएसएसच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधला. हा संवाद बेंगळुरूमधील यूआर राव सॅटेलाइट सेंटरमध्ये बसवलेल्या टेलिब्रिजद्वारे करण्यात आला होता. हॅम रेडिओद्वारे जगभर आणि अंतराळातही संवाद साधता येतो.
शुभांशूने आपला अनुभव सांगितला
शुभांशूने सांगितले की, हा एक उत्तम क्षण होता. आम्हाला वेगवेगळ्या देशांचे अन्न खाण्याची संधी मिळाली आणि आम्ही ते सर्व क्रू सदस्यांसोबत शेअर केले. आम्ही सर्वांनी 'आंब्याचा रस', 'गाजराचा हलवा', 'मूंग डाळ हलवा' चा आस्वादही घेतला. माझ्या टीमला हे भारतीय जेवण खूप आवडले आणि आम्ही एकत्र बसून ते खाल्ले, सर्वांनी त्याचे खूप कौतुक केले.
शुभांशू इस्रो-नासा यांच्या संयुक्त प्रकल्पांतर्गत आयएसएसच्या १४ दिवसांच्या मोहिमेवर आहेत. शुभांशूसोबत अमेरिकेचे पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोझ उजनांस्की-विस्निव्हस्की, हंगेरीचे टिबोर कापू असे इतर तीन अंतराळवीरदेखील आहेट. हे सर्वजण ड्रॅगन अंतराळयानातून २८ तासांच्या प्रवासानंतर गुरुवारी भारतीय वेळेनुसार दुपारी ४.०१ वाजता अंतराळ स्थानकावर पोहोचले. त्यांनी आयएएसमध्ये अनेक प्रयोग केले आहेत. शुभांशूसह अॅक्सिओम-४ च्या क्रूने ३ जुलैपर्यंत पृथ्वीच्या ११३ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. या काळात त्यांनी पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतराच्या सुमारे १२ पट प्रवास केला.
शुभांशूने गुरुवारी रचला इतिहास
शुभांशूने अंतराळात आपला एक आठवडा पूर्ण करत आणखीन एक नवा इतिहास रचला. तो म्हणजे अंतराळात सर्वाधिक काळ राहणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर देखील ठरले आहेत. असे करत त्यांनी राकेश शर्मा यांचा विक्रम मोडला आहे.
राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत इंटरकॉसमॉस कार्यक्रमांतर्गत सात दिवस, २१ तास आणि ४० मिनिटे अंतराळात घालवले. गुरुवारपर्यंत शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात नऊ दिवस घालवले आहेत.
वैज्ञानिक संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान
अॅक्सिओम स्पेसने म्हटले आहे की, अवघ्या सात दिवसांत अॅक्सिओम-४ मोहिमेतील अंतराळवीरांनी वैज्ञानिक संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मिशन कमांडर व्हिटसन यांनी अवकाशात शून्य गुरुत्वाकर्षणात ट्यूमर पेशी कशा वागतात याचा अभ्यास केला. हे कर्करोगाच्या उपचारात उपयुक्त ठरू शकते. शुभांशू प्रयोगांद्वारे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की सूक्ष्म गुरुत्वाकर्षण शैवालच्या वाढीवर आणि अनुवांशिक वर्तनावर कसा परिणाम करते. त्यांनी टार्डिग्रेड्स किंवा वॉटर बेअर्सवर देखील संशोधन केले. वॉटर बेअर्स हे लहान जीव आहेत आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. टार्डिग्रेड्स पृथ्वीवर सुमारे ६०० दशलक्ष वर्षांपासून अस्तित्वात आहेत. टार्डिग्रेड्स अवकाशात कसे टिकतात हे शोधण्याचा प्रयत्न या मोहिमेत करण्यात केला.