Saturday, July 5, 2025

मायक्रोसॉफ्ट कंपनीने पाकिस्तानमधील कार्यालय केले बंद

मायक्रोसॉफ्ट कंपनीने पाकिस्तानमधील कार्यालय केले बंद
इस्लामाबाद : सॉफ्टवेअर क्षेत्रातील बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधील कार्यालय बंद केले आहे. हे कार्यालय पाकिस्तानमध्ये २५ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. आता मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमध्ये एक छोटे कार्यालय सुरू ठेवले आहे ज्यात कंपनीचे पाच सदस्य कार्यरत आहेत. पाकिस्तानमध्ये येणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या उत्पादनांशी संबंधित व्यवसाय हाताळण्याची जबाबदारी या पाच जणांकडे आहे. पण कंपनीने मोठ्या प्रमाणात व्यवसाय करण्याच्या उद्देशाने सुरू केलेले पाकिस्तानमधील कार्यालय बंद केले आहे.

वाढती अस्थिरता, सतत वेगवेगळ्या भागांमध्ये होणाऱ्या हिंसक घटना, वारंवार निर्माण होणारा कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळे पाकिस्तानमधील मोठे कार्यालय बंद करण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने घेतला आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने मोठे कार्यालय बंद करण्याचा निर्णय जाहीर करत पाकिस्तानमधील कर्मचाऱ्यांना कळवला आहे. पाकिस्तानमधील कर्मचाऱ्यांसोबतचा करार संपवण्यात आला आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीची १९० पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यालयं आहेत. क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, सायबर सिक्युरिटी, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा अनेक क्षेत्रात कंपनी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. विंडोज, ऑफिस, एज सारख्या उत्पादनांचा वापर जगभर सुरू आहे. जगभरातील बहुसंख्य पीसींमध्ये आजही मायक्रोसॉफ्ट कंपनीचीच ऑपरेटिंग सिस्टिम आहे. यामुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे पाकिस्तानमधील कार्यालय बंद होण्याची बातमी चर्चेचा विषय झाली आहे.
Comments
Add Comment