
बेंगळुरू: शनिवारी बेंगळुरूमधील श्री कांतीरवा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यजमान म्हणून भाग घेणारा भारतीय खेळाडू नीरज चोप्राने पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत, स्वतःला सिद्ध केले आहे. एनसी क्लासिकच्या पहिल्याच सत्रात नीरजने सुवर्णपदकावर आपला हक्क गाजवला.
सुवर्णपदकावर गवसणी घालणारा नीरजचा सर्वोत्तम भालाफेक हा तिसऱ्या प्रयत्नात होता. आज बेंगळुरूच्या कांतीरवा स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राने इतर ११ खेळाडूंना पराभूत करून ही कामगिरी केली आहे.
सर्वोत्तम कामगिरी करताना नीरजने ८६.१८ मीटर अंतर गाठले. तर केनियाचा ज्युलियस येगो दुसऱ्या क्रमांकावर राहत रौप्यपदक मिळवले. येगोने ८४.५१ चा सर्वोत्तम फेक केला. त्याच वेळी, श्रीलंकेच्या रमेश पाथिरागे (८४.३४ मीटर) ने कांस्यपदक जिंकले. नीरज चोप्राची स्पर्धेत सुरुवात चांगली झाली नाही. त्याचा पहिला प्रयत्न फाऊल होता. त्यानंतर त्याने दुसऱ्या प्रयत्नात ८२.९९ मीटर अंतर गाठले. तिसऱ्या प्रयत्नाने तो अव्वल स्थानावर पोहोचला. तर त्याचा चौथा प्रयत्न फाऊल होता. नीरजचे शेवटचे दोन प्रयत्न अनुक्रमे ८४.०७ आणि ८५.७६ मीटर होते.