
मनभावन : आसावरी जोशी
साऱ्या महाराष्ट्राचे माऊलीपण अंगोपांग मिरवत गेल्या २८ युगांपासून विठ्ठल पंढरीच्या विटेवर मिटल्या डोळ्यांनी उभे आहेत. एका पुरुष दैवताला त्याच्या भक्तांनी माऊली हे जगातील सर्वोच्च बिरूद मोठ्या विश्वासाने बहाल केले आहे. आई होणे यासारखे सुख नाही. यावर मला एका अत्याधुनिक विचारांच्या महिलेने वेड्यात काढले होते. ही एक जीवशास्त्रीय प्रक्रिया आहे. काहींच्या बाबतीत ती घडत नाही म्हणजे ती स्त्री सुखी नाही का...? अर्थात काही ठिकाणी वाद न घालणे हेच योग्य असते, पण आज मात्र मला माझ्या मनातील आईपणाची संकल्पना येथे विठुमाऊलीच्या साक्षीने सांगावीशी वाटली. कोणत्याही जीवशास्त्रीय प्रक्रियेत अडकून पडणारी आईपणाची संकल्पना असूच शकत नाही. कारण ती आई या शब्दाइतकीच आभाळागत खूप-खूप मोठी आहे. आई होण्यासाठी त्या लेकराबरोबर रक्ताचे नाते असण्याची कोणतीही अट नसते. किंबहुना ती असूच शकत नाही. पण तरीही त्या मायलेकरांमधील बंध मात्र अतूट असतात. एकमेकांवरील दृढ विश्वास हा त्या नात्याचा पाया असतो. लेकरू पूर्ण विश्वासाने आपल्या आईवर विसंबलेले असते. आपली आई नेहमीच आपल्यासाठी असेल आणि आहे, हे त्या लेकराला पुरते ठाऊक असते आणि हा त्याचा लडिवाळ विश्वासच आईला अगदी हवाहवासा असतो..
अजून एक गमतीची गोष्ट सांगू का... विठुरायाच्या हृदयाच्या अत्यंत जवळ असणाऱ्या त्याच्या ज्ञानी भक्तालाही अर्थात ज्ञानदेवानांही त्याने या आईपणाचा सन्मान बहाल केला आहे. काय वर्णावी या दोघांच्या माऊलीपणाची किमया... एकाने साऱ्या महाराष्ट्राला आपल्या आईच्या मायेने हृदयाशी धरले आहे. आईप्रमाणेच तो आपल्या लेकराच्या भेटीची वाट पाहत युगानुयुगे उभा आहे, तर ज्ञानियांच्या ठायी साऱ्या विश्वाचे आर्त प्रकटते आहे. अवघ्या प्राणिजाताचे दु:ख ज्ञानराज माऊली समजून घेत आहेत. या आईपणाला कोणतीही जीवशास्त्रीय सीमा नाही, मर्यादा नाही.. आहे ते फक्त आई लेकराचे निर्व्याज प्रेम, विश्वास, ओढ...
वारकरी हा आपल्या महाराष्ट्राचा एक संप्रदाय आहे ही महाराष्ट्राची आणि उत्तरी कर्नाटकमधील हिंदू लोकांची परंपरा आहे. भक्ती आंदोलनाचे प्रमुख संत आणि गुरुजन, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, चोखामेळा महाराज, हे सगळे वारकरी परंपरांशी जोडलेले होते. वारकरी देव पांडुरंग आणि रुक्मिणीमातेला पूजतात. वारीसह संतांची पादुका घेऊन जाण्याची परंपरा संत तुकाराम महाराजांच्या सर्वात लहान अपत्य नारायण महाराजांनी १६८५ साली मध्ये सुरू केली होती. कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी “पंढरीनाथ महाराज की जय”, “माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, “जगतगुरू तुकाराम महाराज की जय”, असे जयघोष केले जातात.
वारकरी गळ्यात तुळशीमाळ घालतात, कारण ती माळ त्यांना माऊलीचे विस्मरण होऊन देत नाही आणि तुळशीमाळ घातली नाही, तर वारी पूर्ण होत नाही असे मानले जाते. वारकरी परंपरांचे काही नियम असतात.. जसे नित्य नियमाने अांघोळ करून गोपीचंदनाचा टीका लावणे (वारकरी पंढरपूर पोहोचल्यानंतर पण चंद्रभागाचे पाण्याने स्नान करतात), पांडुरंगाचे जप करणे, देवाचे दर्शन करणे, भक्ती गीत व अभंग गाणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकादशीचे व्रत पाळणे...
रिंगण आणि धावा :- रिंगण आणि धावा हे दोन सोहळे खूप महत्त्वाचे असतात.
रिंगण :- एका मोकळ्या मैदानात गोलाकार बनवून पहिले वारकरी त्यात धावतात, नंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो, याला आदराने “माऊलीचा अश्व” असे म्हणतात. या घोड्यावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज स्वार होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे.
धावा :- असे मानले जाते जेव्हा तुकाराम महाराज पंढरपूर जात असे तेव्हा त्यांना छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाचे दर्शन झाले आणि तिथून ते पंढरपूरपर्यंत धावून गेले होते. आज त्याच स्मरणामध्ये वारकरी बेलापूरहून पंढरपूरपर्यंत धावून जातात.
४ महिन्यांच्या या काळात वारकरी सगळे भेद सोडून, त्या देवा पांडुरंगाला पूजतात, त्यांच्या भक्तीमध्ये गीत, अभंग गातात आणि एकासमोर वाकून नमन करतात कारण “आपण सगळे ब्रह्म आहोत” असा
त्यांचा ठाम विश्वास असतो. याच साधेपणावर विठुमाऊंलीचा पूर्ण विश्वास आणि आवडही...
विठ्ठल हा मूळचा लोकदेव आहे. तो गोपजनांचा, गवळी-धनगरांचा देव आहे. विठ्ठल हे दैवत गोपजनांच्या, गवळी-धनगरांच्या परंपरेत आजही आपले आदिम रूप सांभाळून आहे. कर्नाटक-महाराष्ट्रातले गोपजन त्याला विठ्ठल-बीरप्पा या जोडनावाने संबोधतात. त्यांच्या मंदिरात दोन पिंडी ठेऊन ते या जोडदेवाची पूजा-अर्चा करतात. बीरप्पा किंवा बिरोबा हा धनगरांचा मुख्य देव आहे. बहुसंख्य कथांमध्ये विठ्ठल हा बीरप्पाचा निकटतम सहयोगी देव किंवा भाऊ म्हणून येतो.
विठ्ठलाला प्रिय असलेला गोपाळकाला; तसेच विठ्ठलभक्त संतांनी रचलेली भारूडे यांचा संबंधही गोपजन-धनगर संस्कृतीशी येतो. काही अभ्यासकांनी गोपाळकाल्याचा संबंध वैदिक “करंभा’शी जोडलेला आहे. करंभ हे खाद्य गोपाळकाल्याचेच पूर्वरूप असावे, कारण
“करंभः दधिसक्तवः” असे त्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. हा पदार्थ सातूचे पीठ आणि दही एकत्र कालवून बनवितात. वैदिक देवाला तो खास आवडतो. हा देव वृषभमुखाची काठी हाती धारण करणारा, कांबळे पांघरणारा, गायागुरांची खिल्लारे राखणारा आणि गोपजनांना वाटा दाखविणारा आहे. तो गोपजनांचा देव आहे. तो अहिंसकही आहे. त्याला दही आणि पीठ आवडते, तर पंढरपूरचा विठ्ठल ताक आणि पीठाने संतुष्ट होतो. त्याच्या या प्रेमाची स्मृती “ताकपिठ्या विठोबा’च्या रूपाने पाहावयास मिळते.
दुसरी गोष्ट भारूडाची. या शब्दाचा मूळ अर्थ धनगर असा आहे. गुजरातमध्ये आजही भरवाड या नावाची पशुपालक जमात आहे. तिचे नाव भारूड या धनगरवाचक नावाशी जवळचे आहे.
पुन्हा पंढरपूर हे स्थानही प्राचीन काळी धनगरांचा जो स्थलांतराचा मार्ग होता, त्या मार्गावरच येते, पंढरपूर हे या फिरत्या जमातीचे एकत्र येण्याचे ठिकाण होते. आषाढी आणि कार्तिकीची पंढरपूरची यात्रा धनगरांच्या वेळापत्रकाशी निगडित आहे.
या त्याच्या सामान्यांमध्ये वसण्याच्या आवडीमुळेच साधी साधी संकटे, दु:ख, भक्तांच्या व्यथा त्याला सहज समजतात. त्या दु:खांशी तो अगदी तादात्म्य पावतो. अगदी आईगत त्यांच्या प्रत्येक सुख दु:खात उभा राहतो.. अगदी ठामपणे, आपल्या मुलांच्या पाठीशी...