
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
पाच वर्षांपूर्वी अचानक दैनिक प्रहारचे महाव्यवस्थापक मनिष राणे यांचा मला फोन आला व त्यांनी मला भेटायला बोलावले. दुसऱ्याच दिवशी मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील प्रहारच्या कार्यालयात त्यांना भेटायला गेलो. त्यांनी माझ्याकडे प्रहारमध्ये संपादक म्हणून येणार का अशी विचारणा केली. लोकमत आणि नवशक्ति मुंबईच्या या दोन वृत्तपत्रांच्या संपादकपदाचा माझ्याकडे अनुभव होताच. शिवाय पुण्याच्या दैनिक केसरीमध्ये साडेपाच वर्षे कार्यकारी संपादक म्हणून काम केले होते.
मुंबई आणि दिल्लीच्या पत्रकारितेचा माझ्याकडे मोठा अनुभव असल्याने मनिष राणे यांची ऑफर ऐकून मला सुखद धक्का बसला. त्यानंतर त्यांनी माझी राणे प्रकाशनचे संचालक नितेश राणे यांच्याशी भेट घडवली. चर्चा सकारात्मक झाली. पण अंतिम निर्णय नारायण राणेसाहेब घेतील असे नितेश यांनी मला सांगितले. त्यानंतर जुहू येथील अधिश बंगल्यावर मनिष राणे व नितेश राणे यांच्या उपस्थितीत नारायण राणेसाहेबांची माझी भेट झाली. राणेसाहेब म्हणाले, १ तारखेला रुजू व्हा, कामाला सुरुवात करा आणि माझ्याशी नियमित संपर्कात राहा...
प्रहारच्या संपादकपदाची ऑफर प्रत्यक्षात साकार होईल असे मला तोपर्यंत वाटले नव्हते. पत्रकारितेतील माझ्या मित्रांना मी प्रहारला संपादक म्हणून रुजू होणार असल्याचे सांगितले तेव्हा त्यांना धक्काच बसला. नारायण राणेंच्या वृत्तपत्रात काम करणे सोपे नाही, तिथे तू रमणार नाहीस... असाही सल्ला माझ्या मित्रांनी दिला.
पत्रकारितेची बरीच वर्षे माझी लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, नवशक्ति अशा नामवंत व प्रतिष्ठित दैनिकात गेली, नारायण राणेंसारख्या मोठ्या आणि सतत चर्चेत असलेल्या राजकीय नेत्याच्या दैनिकात काम करणे सोपे नाही, याची मलाही कल्पना होती. प्रहार हे राणे परिवाराचे मुखपत्र आहे, राणे परिवाराची भूमिका मांडणारे राजकीय दैनिक आहे आणि प्रहारचा वाचक हा प्रामुख्याने कोकणातील आहे याची मला जाणीव होती. तरीही एक आव्हान म्हणून प्रहारमध्ये काम करण्याचे मी ठरवले.
पाच-साडेपाच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. कोविडच्या संकटातून मुक्तता व्हायला सुरुवात झाली होती. मी प्रहारमध्ये रुजू झालो तेव्हा संपादकीय विभागात सुनील सपकाळ, रेखा शिंदे आणि आर्टिस्ट म्हणून समीर व वैष्णवी शीतप असे चार जणच होते. ज्येष्ठ प्रूफ रिडर अजित राऊत सर्व आठ पानांचे बारकाईने वाचन करीत असत. सिंधुदुर्ग व रत्नागिरी प्रहार आवृत्तीकडून कोकणातील वृत्तांत मिळवून कोकणसाठी पान दिले जात होते. हळूहळू नवे सहकारी येऊ लागले.
जाहिरातींचा ओघ वाढू लागला. प्रहारचा अंकही मुंबईच्या कानाकोपऱ्यांत पोहोचू लागला. मनिष राणे व प्रशासन, लेखा व एचआर विभागाचे प्रमुख ज्ञानेश सावंत यांच्या अथक परिश्रमातून प्रहार वाढत होता. लवकरच आठची दहा पाने झाली. नंतर पाठोपाठ रविवारची कोलाज पुरवणी सुरू झाली. नंतर दर सोमवारी अर्थ विश्व, बुधवारी स्त्री ही मल्टीटास्कर, गुरुवारी श्रद्धा - संस्कृती, शनिवारी रिलॅक्स अशा बहारदार पुरवण्या सुरू झाल्या.
मुंबईतील वृत्तपत्रसृष्टीत एक दर्जेदार दैनिक म्हणून प्रहारची ओळख झाली. प्रहार व्यासपीठ ही तर वाचकांना मिळालेली देणगी आहे. दर आठवड्यात प्रासंगिक विषयावर वाचकांना त्याचे मत किंवा भूमिका मांडण्यासाठी हे मुक्त सदर आहे. गेल्या आठवड्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती या विषयावर वाचकांना त्यांचा अभिप्राय विचारला होता. दोन दिवस पूर्ण पानं भरतील एवढ्या पत्रांचा प्रहारमध्ये पाऊस पडला. कोलाज व अन्य साप्ताहिक पुरवण्यांतून प्रहारने गेल्या पाच वर्षांत साठपेक्षा जास्त लेखकांची टीम उभी केली, याचा मला अभिमान वाटतो. याच पाच वर्षांच्या काळात प्रहारची नाशिक आवृत्ती सुरू झाली.
प्रहारचा अंक रोज पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात पोहोचू लागला. शिर्डीला साई संस्थानसमोरच प्रहारचे विभागीय कार्यालय सुरू झाले. प्रहारच्या अहिल्यानगर आवृत्तीसाठी तयारीही सुरू झाली आहे. नाशिकला सुरुवातीला चंद्रशेखर गोसावी, कुमार कडलग, नंतर प्रताप जाधव यांनी सांभाळली, तर शिर्डीला राजेश ऊर्फ राजकुमार जाधव जबाबदारी सांभाळत आहेत. गेल्या पाच वर्षांत प्रहारने अनेक अडचणींवर मात करून महामुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात झेप घेतली आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतो.
संपादकीय विभागाचे नेतृत्व करताना राणे परिवाराने मला खूप मोकळीक दिली होती. दर रविवारी स्टेटलाइन व दर बुधवारी इंडिया कॉलिंग अशा स्तंभातून मी एकदाही खंड पडू न देता नियमित लेखन केले. त्यात प्रामुख्याने राजकीय भाष्य व विश्लेषण असायचे. पाच वर्षांत साडेपाचशेहून अधिक माझे लेख प्रहारमध्ये प्रसिद्ध झाले. या लेखांनी मोठा वाचक निर्माण केला. प्रहारमध्ये वाचकांचा जिवंत प्रतिसाद मिळतो. जर लिहिताना चूक झाली तर ती लक्षात आणून देणारे असंख्य फोन व संदेश येऊन धडकतात म्हणूनच प्रहारमध्ये काळजीपूर्वक लेखन करावे लागते. लेख वाचून प्रतिक्रिया कळवणारे अनेक आयपीएस व आयएएस तसेच निवृत्त सनदी अधिकारी मला वाचक म्हणून लाभले ही माझी मोठी पुंजी समजतो.
प्रहारमध्ये काम करीत असताना मोठे काय घडले किंवा उद्याची हेडलाईन काय आहे, पहिल्या पानावर कोणत्या बातम्या आहेत याची नारायण राणेंशी चर्चा करण्याची संधी मला मिळत असे. नारायण राणे हे प्रहारचे सल्लागार संपादक आहेत. काय हवे व काय नको याविषयी त्यांचा सल्ला नेहमीच परखड असतो. मी प्रहारमध्ये नवीन असताना दि. २२ जानेवारीला रात्री ९ वाजता त्यांनी मला फोन करून उद्याच्या दि. २३ जानेवारीच्या अंकात पहिल्या पानावर शिवसेनाप्रमुखांचा फोटो घेतला का, अशी विचारणा केली होती. फोटोसोबत त्यांच्या स्मृतीला अभिवादन असा उल्लेख करायला सांगितले.
शिवसेनाप्रमुखांविषयी त्यांच्या मनात अतिव आदर आहे. त्यांनीच आपल्याला घडवले हे ते कधी विसरू शकत नाहीत. एकदा प्रहारमध्ये पहिल्या पानावर त्यांच्या दृष्टीने एक मोठी चूक झाली होती, त्या दिवशी ते लीलावती इस्पितळात उपचारासाठी दाखल होते, पण तेथे त्यांनी मला बोलावून अंकात प्रसिद्ध झालेली चूक लक्षात आणून दिली. मोठ्या साहेबांनी बोलावले आहे, असा निरोप त्यांच्या पीएकडून येतो तेव्हा प्रहारमध्ये मोठी चूक झाली असावी, असे समजायचे. भेट झाल्यावर प्रहारचे अंक समोर ठेऊन ते चुका दाखवतात, असा अनुभव मला अनेकदा आला आहे. चूक कोणी केली किंवा त्या पानावर कोण होते असेही साहेब विचारत असत. आपल्या टीममधील कोणाकडून चूक झाली, तर त्याची जबाबदारी आपणच घेतली पाहिजे अशीच मी नेहमी भूमिका बजावली. नारायण राणे यांच्याकडे नेहमीच माहिती अद्ययावत असते. आपण त्यांना एखादी घटना ताजी म्हणून सांगितली तर ते लगेच सांगतात, ते तर मला ठाऊक आहे, पुढे काय घडले ते सांग...
शिवसेना आमदार निलेश राणे हे नेहमीच संपादकांना आदर देतात. अमूक एक बातमी किंवा फोटो प्रसिद्ध करा असे कधी सांगितल्याचे मला आठवत नाही. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रहारवर बारीक लक्ष असते. प्रहार म्हणजे राणे परिवाराचा चेहरा आहे, याबाबत त्यांचा कटाक्ष असतो. अन्य वृत्तपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांनी काहीही भडक दिले तरी प्रहारने वास्तवाचे भान ठेऊन वृत्त दिले पाहिजे यासाठी ते दक्ष असतात. नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे, सौ. निलम नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गेली पाच वर्षे विशेष पुरवणी काढण्याची मला संपादक म्हणून संधी मिळाली.
मुंबई आणि कोकणातील अनेक मान्यवरांचे लेख त्यात प्रसिद्ध झाले. राणे परिवाराचे काम व त्यांच्या जीवनातील विविध पैलू यानिमित्ताने वाचकांपुढे ठेवता आले हे सांगताना मला विशेष आनंद होतो.
प्रहारचा संपादक म्हणून सूत्रे हाती घेतल्यावर वाढदिवस, पंचांग, दैनिक व साप्ताहिक राशिभविष्य द्यायला सुरुवात केली. पुण्याचे ज्योतिषी मंगेश महाडिक यांचे मला मोठे सहकार्य लाभले. त्यांनी पाच वर्षांत एकही दिवस किंवा सप्ताह चुकवला नाही. शिवाय दिवाळीत वार्षिक भविष्यही त्यांनी आवर्जून दिले. संपादकीय पानावर लेखांसाठी अद्वैत फिचर्सचे मंगेश पाठक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रहारचा मुंबई आवृत्तीचा वर्धापन दिन दि. ९ ऑक्टोबरला, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी आवृत्तीचा वर्धापन दिन ९ नोव्हेंबरला साजरा होतो. तसेच कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाला मराठी भाषा दिनाला नाशिक आवृत्तीचा वर्धापन दिन साजरा केला जातो. गेल्या वर्षापासून शिर्डीलाही कार्यक्रम होऊ लागला आहे. यानिमित्ताने संपादक म्हणून मला सर्वत्र जाण्याची संधी तर मिळालीच पण तेथील पत्रकार, त्या परिसरातील नामवंतांशी संवाद साधण्याची संधी मिळाली व त्यातून अनेक मोठ-मोठी माणसे प्रहारशी जोडली गेली.
मनिष राणे यांच्या कल्पनेतून मुंबई येथे प्रहार गजाली हा कार्यक्रम श्रावण महिन्यात प्रहारने सुरू केला. कला क्षेत्रातील सेलिब्रेटी तसेच विविध क्षेत्रांत ज्यांनी काही मोठे साध्य केले आहे, समाजसेवेसाठी ज्यांनी नि:स्वार्थी मनाने वाहून घेतले आहे, अशा व्यक्तींना निमंत्रित करून त्यांच्याशी प्रहार गजाली कार्यक्रमात मुक्त संवाद साधला जातो. दैनिक प्रहार तसेच प्रहार डिजिटलवरून त्याला मोठी प्रसिद्धी दिली जाते, या उपक्रमालाही वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अशा कार्यक्रमांना पत्रकारिता व कला क्षेत्रातील नामवंत वैजंयती कुलकर्णी-आपटे यांचे नेहमीच आम्हाला सहकार्य लाभले.
दरवर्षी ८ मार्च रोजी महिला दिनाला प्रहारच्या वतीने अनोखे उपक्रम योजले जातात, केवळ डॉक्टर्स, सेलिब्रेटीच नव्हे तर रिक्षाचालक, बसचालक, पोलीस, सुरक्षा रक्षक, समाजसेवा अशा क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांनाही प्रहारने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आयपीएल धमाका प्रहारनेच करावा आणि नवरात्रीत देवींचे दर्शन घडवताना पैठणीची स्पर्धा प्रहारनेच आयोजित करावी, गणेशोत्सवातही प्रहारच आघाडीवर असतो. या उपक्रमांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. श्रावणातील मंगळागौर स्पर्धाही वाचकांचे मोठे आकर्षण ठरले आहे.
कोणत्याही वृत्तपत्रात, मीडिया हाऊसमध्ये अगदी वृत्तवाहिन्यांमधे काम करताना त्या कंपनीच्या धोरणांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागते. आपण संपादक असलो तरी कंपनीचे कंत्राटी कर्मचारी आहोत, याचे भान ठेवले तर तुम्ही कुठेही काम करू शकता. कंपनीने घालून दिलेली लक्ष्मणरेषा लक्षात ठेवली तर रोजचे काम करताना कुठेच अडचण येत नाही. गेल्या पाच वर्षांत प्रहारच्या व्यवस्थापनाने आणि राणे परिवाराने मला संपादक म्हणून खूप मान-सन्मान दिला. संपादकीय, जाहिरात, वितरण आणि मार्केटिंग या सर्व टीम एकजुटीने काम करतात व त्यातूनच प्रहार प्रगतिपथावर आहे.
मनिष राणे व ज्ञानेश सावंत ही जोडी प्रहारची मोठी जमेची बाजू आहे. कल्पकता, जिद्द आणि सातत्य हे गुण या जोडीकडे विलक्षण आहेत. संपादकीय विभागातील माझे सहकारी संदीप खांडगेपाटील, महेश पांचाळ, प्रूफ रीडिंग विभागाचे अजित राऊत, छायाचित्रकार अरुण पाटील, आर्ट विभागाचे प्रमुख निलेश कदम, डिजिटलचे राजेश सावंत आणि रोहन, प्राची व साक्षी, आयटी विभागाचे राकेश दांडेकर व हितेश सुर्वे यांचा प्रहारच्या वाटचालीत वाटा मोठा आहे. विविधतेने नटलेल्या व साहित्य संपन्न कोलाज पुरवणी वेळेत देणारी प्रहारची कोकण कन्या वैष्णवी भोगले आणि क्रीडा पानावर रमलेली साक्षी माने यांच्या शब्दकोषात कधी नकार सापडलाच नाही.
मंत्रालय विधिमंडळ प्रतिनिधी सुनील जावडेकर व अष्टपैलू वार्ताहर अल्पेश म्हात्रे हे तर प्रहारचे दूत आहेत. संपादकीय टीममध्ये ये-जा चालूच असते. सुनील सकपाळ, दीपक परब, दीपक मोहिते, कमलेश सन्ते, मनोज जोशी, विशाल राजे, प्रियानी पाटील, जोस्त्ना कोट, रोहित गुरव, वैष्णवी शीतप असे चांगले सहकारी अन्यत्र गेले व तिथे स्थिरावले. कोकण आवृत्तीचे आमचे निवासी संपादक संतोष वायंगणकर, कणकवली कार्यालयातील किशोर राणे, रत्नागिरीचे नरेंद्र मोहिते व डिजिटल टीमचे हेमंत कुलकर्णी व अनघा निकम यांचा उत्साह परिवारात चैतन्य निर्माण करणारा आहे. जाहिरात विभागाचे दिनेश कहर, कौशल श्रीवास्तव, किशोर उज्जैनकर, चंदन पेडणेकर, सुशील परब, उमेश गायकवाड, वितरण विभागाचे राजेश मर्तल ही सर्व जिद्दीने काम करणारी टीम प्रहारकडे आहे.
प्रहारमध्ये संपादक म्हणून काम करीत असतानाच पत्रकारितेतील कामगिरीबद्दल अनेक पुरस्कार मला मिळाले. पत्रकार संघटना व वृत्तपत्रांच्या कार्यक्रमांना मला भरपूर निमंत्रणे आली. स्टेटलाइन हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कुलपती
डॉ. दीपक टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली मास कम्युनिकेशमध्ये पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून मला पीएच.डी. मिळाली. येत्या ११ जुलै रोजी मी वयाची ७३ वर्षे पूर्ण करून ७४ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मी पत्रकारितेत सक्रिय आहे. प्रहारमध्ये संपादक म्हणून काम करतानाचा पाच वर्षांचा कालावधी विविध उपक्रमांनी भरगच्च, भारावलेला व आनंदाचा होता, हे मी कधीच विसरू शकणार नाही. शनिवार दि. ५ जुलै रोजी मी संपादकीय सेवेतून निरोप घेतला.
[email protected]
[email protected]