
मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी राज ठाकरेंचे आभार मानले तर उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘रुदाली’ असा केला.
राज्य सरकारने हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर आज (शुक्रवार, ५ जुलै) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र विजयी मेळावा घेतला. मुंबईतील वरळी येथील डोम सभागृहात या विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला. तब्बल २० वर्षांनंतर उद्धव आणि मी एका मंचावर येत आहोत. जे बाळासाहेबांनाही जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हा दोघांना एकत्र आणण्याचं, ते काम देवेंद्र फडणवीस यांना जमलं” असे राज ठाकरे यांनी म्हटलं, त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, मी राज ठाकरे यांचे आभार मानतो, त्यांच्या एकत्रित येण्याचं श्रेय त्यांनी मला दिलं आहे.
हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रूदाली होती..
मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी दोन्ही बंधू एकत्र येण्याचे श्रेय त्यांनी मला दिले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील. पण मला असं सांगण्यात आलं होतं की तिथं विजय मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी भाषण रुदाली देखील झालं आणि मराठी बद्दल एक शब्द न बोलता, केवळ आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या. आम्हाला निवडून द्या. हा मराठीचा विजय उत्सव नव्हता. ही रूदाली होती, त्याचं दर्शन दिसून आलं आहे.
पब्लिक सब जानती है...
मुळात २५ वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्या लायक ते येथे काहीच काम करू शकले नाहीत. पण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा मोहरा बदलला, त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार झाला. आम्ही बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला, पत्रा चाळीतील मराठी माणसाला, अभ्युदय नगरच्या मराठी माणसाला स्वतःच्या हक्काचे घर त्याच ठिकाणी दिले. त्याची असूया त्यांच्या मनामध्ये आहे. पण मी नेहमी सांगतो पब्लिक सब जानती है. त्यामुळे मुंबईतला मराठी असो किंवा अमराठी सगळेच आमच्या सोबत आहेत. आम्ही मराठी आहोत. आम्हाला मराठी असल्याचा अभिमान आहे. मराठी भाषेचा अभिमान आहे. त्याचवेळी आम्ही हिंदू आहोत. आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे आणि आमचे हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे हिंदुत्व आहे, असेही पुढे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.