Saturday, July 5, 2025

Eknath Shinde : "आजचा मेळावा म्हणजे द्वेष, जळजळ, मळमळ..."; उपमुख्यमंत्री शिंदेचा राज-उद्धव मेळाव्याला टोला

Eknath Shinde :

"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा" : उपमुख्यमंत्री शिंदे


मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर दिसले.सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र सभा घेतली. या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू १९ वर्षांनी एकत्र आले. त्यामुळे आता आगामी काही दिवसांत होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेमकं काय होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. असं असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विजयी मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी विषयीची तळमळ दिसली पण उद्धव ठाकरेंच्या भाषणात सत्तेची, स्वार्थाची मळमळ दिसली, असा हल्लाबोल शिंदे यांनी केला आहे. तसेच मराठी माणसांचा अपेक्षाभंग झाला आहे, असे म्हणत त्यांनी विजयी मेळाव्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. ते माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.



मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का फेकला गेला?


आजचा मेळावा हा मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी असल्याचे सांगितले जात होते. पण ठाकरे यांच्या भाषणात आगपाखड होती. द्वेष, जळजळ, मळमळ होती. हे सगळं त्यांच्या भाषणात दिसून आलं. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का फेकला गेला? मुंबईतील मराठी लोकांचे प्रमाण का होत गेले. मराठी माणूस वसई-विरार, नालासोपारा, बदलापूर, अंबरनाथ, वांगणी इथपर्यंत का बाहेर गेला? असा रोखठोक सवाल यावेळी शिंदे यांनी केला.



सत्ता अन् खुर्चीसाठीची मळमळ दिसली


राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावरही प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी माणसासाठी असलेली तळमळ दिसली. तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्ता आणि खुर्चीसाठीची मळमळ दिसली, अशी टीका शिंदे यांनी केली. उद्धव ठाकरे माझ्यावर सातत्याने टीका करत असतात. पण मी त्यांच्या टीकेला उत्तर देत नाही. मी कामातून उत्तर दिलं. त्यामुळेच मी मुख्यमंत्री झालो. अडीच वर्षांनी झालेल्या निवडणुकीतही आमचा मोठा विजय झाला, अशी उदाहरणं देत जनतेने उद्धव ठाकरेंना नाकारलं असं एकनाथ शिंदेंनी यांनी म्हटलंय.



'तीन वर्षांपूर्वी आम्ही त्यांना 'धो डाला'


"तीन वर्षांपूर्वी आम्ही त्यांना 'धो डाला'. त्यामुळे 'उठेगा नाही साला' हा डायलॉग उद्धव ठाकरे यांना शोभून दिसतो. ३ वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला, अन्यायाविरोधात आवाज उठवला. तेव्हा दाढीवरून अर्धाच हात फिरवला होता. त्याने ते आडवे झाले, अजून सावरले नाहीत. आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे 'उठेगा नही' वगैरे हे त्यांना शोभून दिसते. काही गोष्टी करण्यासाठी मनगटात जोर लागतो, फक्त तोंडाच्या वाफा दवडून होत नाही. मी एवढेच सांगेन की एकाने मराठीबद्दल असलेली तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. 'झेंडा नाही, अजेंडा नाही' असा काही लोकांनी म्हटलं होतं, पण ते एकानेच पाळले; दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा दाखवला," अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.




आजचा मेळावा म्हणजे द्वेष, जळजळ, मळमळ...


"मराठी बाबत जर बोलायचं झालं, तर ज्या पंतप्रधान मोदींनी मराठीला अभिमान भाषेच्या दर्जा दिला. त्यांनाही तुम्ही सोडले नाही. त्यांच्यावरही टीका केली. आजचा मेळावा मराठी भाषेसाठी किंवा मराठी माणसांसाठी फायद्याचा नव्हता. केवळ आगपाखड होती, द्वेष होता, जळजळ होती, मळमळ होती ती दिसून आली. आम्ही काय केलं आणि त्यांनी काय केलं हे स्पष्ट दिसतंय. मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला का गेला? मराठी टक्का कमी का झाला? वसई, विरार, नालासोपारा, बदलापूर, अंबरनाथ, वांगणीपर्यंत का गेला? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे," असा सवाल शिंदे यांनी केला.

Comments
Add Comment