
मुंबई : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांसाठी कचरा उचलण्यासाठी मोठ्या आणि छोट्या कॉम्पॅक्टरसह मनुष्यबळाची सेवा खासगी संस्थेमार्फत घेतली जाणार आहे. या कंत्राट कामांमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रती १०० मीटर अंतरावर छोट्या आकाराच्या कचरा पेट्या बसवल्या जाणार आहेत. आजवर अशाप्रकारच्या लटकत्या कचरापेट्या बसवल्या गेल्या असल्या तरी त्याची योग्यप्रकारे स्वच्छता आणि देखभाल तसेच त्यातील कचरा उचलला न गेल्याने या कचरा पेट्या अस्वच्छ दिसून येत होत्या; परंतु आता नव्याने आकर्षक स्वरुपात तब्बल २३ हजार कचरापेट्या बसवल्या जाणार असून त्यांची दैनंदिन स्वच्छता आणि देखभालही संबंधित संस्थेकडून केली जाणार आहे.
पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने सध्या कचरा उचलण्यासाठी खासगी संस्थेकडून पुरवल्या जाणाऱ्या कॉम्पॅक्टर सेवेचे कंत्राट संपुष्टात येत असल्याने आता नव्याने २१ विभागांमध्ये मनुष्यबळासह कचरा गाड्या पुरवण्यासाठी कंत्राट कामांसाठी निविदा निमंत्रित केली आहे. या नव्याने कंत्राट कामांमध्ये ७ टनाच्या कॉम्पॅक्टर असतील आणि यामध्ये निव्वळ कचरा असेल तसेच सुका कचरा आणि घातक कचऱ्यासाठी स्वतंत्र वाहने असतील. मात्र, या कंत्राट कामांमध्ये रस्त्याच्या कडेला १०० मीटर अंतरावर थुंकण्यासाठी तसेच किरकोळ कचरा टाकण्यासाठी आकर्षक कचरापेट्या बसवल्या जाणार आहेत.