मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. नंतर केडिया यांनी एक्सवर माफीचा व्हिडिओ पोस्ट केला.
मीरारोड येथील एका अमराठी व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर एक दिवस मीरा-भाईंदर शहरातील अमराठी व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यानंतर संतापलेल्या केडिया यांनी एक्सवर पोस्ट करत मी मराठी बोलणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा असे थेट आव्हान राज ठाकरे यांना दिले होते.या विधानामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी वरळी येथील डोममध्ये मेळाव्यासाठी जात असताना केडिया यांच्या कार्यालयावर नारळ आणि दगडफेक केली.
या घटनेत कार्यालयाच्या काचा फुटल्या असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.राज ठाकरे यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना असा धडा शिकवला जाईल अशी भूमिका मनसैनिकांनी घेतली असून सुशील केडियाला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही त्यांनी म्हटले. पोलिसांनी तणाव वाढू नये म्हणून तत्काळ हस्तक्षेप करत काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
यानंतर केडिया यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या वक्तव्याची माफी मागितली. त्यात त्यांनी म्हटले, मी केलेलं ते ट्विट चुकीच्या मानसिक अवस्थेत व तणावात लिहिलं गेलं होतं. पण माझ्या त्या ट्विटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. काही लोकांना वाद निर्माण करत त्यामधून फायदा मिळवण्याचा होता. पण मराठी न कळणाऱ्या काही जणांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मी मानसिक तणावाखाली होतो. पण मला आता जाणवत आहे की मी माझी प्रतिक्रिया मागे घ्यायला हवी.