Friday, August 15, 2025

अलिबाग-वडखळ मार्ग; आज-उद्या जड वाहनांची वाहतूक बंद

अलिबाग-वडखळ मार्ग; आज-उद्या जड वाहनांची वाहतूक बंद

अलिबाग : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अलिबाग ते वडखळ राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ए या मार्गावर दर शनिवार व रविवार जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्या खासगी वाहनांद्वारे येत असल्याने दर आठवड्याच्या शेवटी येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यामुळे रुग्णवाहिकांना अडथळा, तसेच अपघाताची शक्यता वाढते. पोलीस अधीक्षक रायगड यांनी सुचविलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

शनिवार सकाळी ८ ते दुपारी २, रविवारी दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा मार्ग जड-अवजड वाहने इत्यादी वाहनांना बंदी असेल.तर दूध, डिझेल, पेट्रोल, एलपीजी गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणारी वाहने,रुग्णवाहिका, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, महिला सशक्तीकरण मोहिमेसाठी नेमलेली वाहने यांना या कालावधीत मुभा असेल. हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून, पुढील आदेश येईपर्यंत तो लागू राहील. स्थानिक नागरिक व पर्यटकांना यामुळे सुरक्षित, सोयीस्कर व अडथळा विरहित प्रवासाचा अनुभव मिळेल. वाहन चालक व नागरिकांनी सहकार्य करावे, वाहतूक बंदीच्या वेळा लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा