
टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
अशोक शिंदे हे मनोरंजन सृष्टीत गेल्या चाळीस वर्षांपासून कार्यरत आहेत. नाटक, मालिका, चित्रपट क्षेत्रात त्यांनी अभिनयाची मुशाफिरी केलेली आहे. आज त्यांचे तीन मराठी चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत. एक मालिका देखील रिलीज होणार आहे.
पुण्यातील डेक्कन जिमखाना विभागातील आपटे विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांचे वडील मेकअप आर्टिस्ट होते,परंतु अशोकजींना शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेण्यास त्यांचा विरोध होता. त्यानंतर त्यांनी १२ वी मॉडर्न कॉलेजमधून केले. त्यानंतर त्यांनी बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग केले. वडिलांसोबत ते देखील मेकअपला जायचे. डॉ. काशिनाथ घाणेकर, अरुण सरनाईक, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू या साऱ्यांचा मेकअप त्यांनी केला. प्रसिद्ध मेकअप मॅन विक्रम गायकवाड व अशोकजी ‘जाणता राजा ‘नाटकाच्या ३५० लोकांचे मेकअप व वेशभूषा करायचे. इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभिनेते सतीश तारे सोबत काही एकांकिका केल्या. त्याच दरम्यान संगीतकार राम कदम यांची ‘पठ्ठे बापूराव पवळा’ हा चित्रपट लाँच झाला होता. त्यांनी अशोकजींना पठ्ठे बापूरावची भूमिका ऑफर केली. त्यासाठी महिनाभर तयारी करून घेतली. त्या चित्रपटामध्ये मोहन जोशी, मेनका जाधव हे इतर कलाकार होते; परंतु हा चित्रपट काही रिलीज झाला नाही.’ रेशीमगाठी’ हा त्यांचा पहिला चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामध्ये वर्षा उसगावकर, डॉ. श्रीराम लागू, सुहास जोशी हे कलाकार होते. त्या चित्रपटामध्ये प्रेमकथा होती. त्यानंतर’ रंगत संगत,‘एकापेक्षा एक’ हे त्यांचे सिनेमे आले. एकापेक्षा एक हा सिनेमा गाजला. त्यानंतर ‘हमाल दे धमाल’ चित्रपटात प्रमुख पाहुण्याची भूमिका केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या अभिनयाची घौडदौड सुरूच राहिली. जवळपास १८० सिनेमे त्यांनी केले.
एकदा गायक सुधीर फडके यांच्या कार्यक्रमाला संगीतकार राम कदम यांनी त्यांना बोलावले व दुसऱ्या दिवशी घरी येण्यास सांगितले. त्यांना वाटले कदाचित मेकअप किंवा वेशभूषेचे काम असेल. दुसऱ्या दिवशी घरी गेले असता संगीतकार राम कदम यांनी त्यांना पठ्ठे बापूराव सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. हा त्यांच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला. मेकअप आर्टिस्ट ते कलाकार असा त्याचा प्रवास घडला.
अभिनयासाठी त्यांनी कोणतेही माध्यम वर्ज्य केले नाही. त्यावेळी दामिनी मालिका सुरू होती. या मालिकेच्या दिग्दर्शिका कांचन अधिकारी त्यांना म्हणाल्या होत्या की तुमचे चित्रपट आम्ही पाहिले आहेत, मालिकेत काम करणार का? अशोकजींनी’ दामिनी ‘मालिकेत काम केले. त्यानंतर चित्रपट, मालिका असा त्यांचा प्रवास सुरू झाला. आता त्यांची ‘सारं काही तिच्यासाठी ‘ ही १०६ वी मालिका होती, जी नुकतीच संपली. विजय दीनानाथ चव्हाण, एवढसं आभाळ हे त्यांचे चित्रपट आले. ‘एवढसं आभाळ’ चित्रपटाला ५२ अॅवॉर्ड होते ‘हर हर महादेव,’ ‘स्वाभिमान’ या त्यांच्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.
आता त्यांचे तीन मराठी चित्रपट रिलीज होण्याचा मार्गावर आहेत. ‘आजचा दिवस वन डे ऍट दि टाइम’ हा त्यांचा एक चित्रपट आहे. मुक्तांगण हे पुण्याचे व्यसन मुक्ती पुनर्वसन केंद्र आहे. त्यांनी चित्रपटाला नाव दिले आहे. दारू पिऊन माणसांची कशी वाट लागते व ती कशी सोडवावी. हे या चित्रपटात दाखविले आहेत. आजचा दिवस महत्त्वाचा उद्याच्या दिवसाबद्दल काही सांगू शकत नाही.
यामध्ये मुख्य भूमिकेत ते आहे. दुसरा चित्रपट आहे ‘केस नं. ७३’, हा मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे. पुण्यातील डॉ. मिलिंद आपटे सायकॉलॉजिस्ट यांच्यावरील कथानक या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. यामध्ये तीन स्टेज आहेत, ४०,५५,६५. यात त्या डॉक्टरांच्या भूमिकेत ते आहेत. खऱ्या घटनेवर आधारित या चित्रपटाचे कथानक आहे. ‘स्वप्नसुंदरी’ हा तिसरा चित्रपट येणार आहे. नात्यावर आधारित हा चित्रपट आहे. शिल्पा नवलकर, सायली पाटील, भूषण प्रधान हे इतर कलाकार त्या चित्रपटामध्ये आहेत.
आता एक नवीन प्रकार सुरू झाला आहे तो म्हणजे वर्टिकल टीव्ही. मायक्रो व मिनी सीरियल सुरू होत आहे. मिनी म्हणजे सात मिनिटांची मालिका होय. मायक्रो म्हणजे वर्टिकल. झी ५ ने बुलेट नावाचा अँप विकत घेतला आहे. त्यामध्ये ६० मिनिटांची मालिका असते. या मालिकेतील प्रत्येक भाग एका मिनिटाचा असतो.’ सांग तू नाहीस ना’ ही शशांक सोलंकीची पहिली मालिका येत आहे. यामध्ये अशोकजींच्या आयुष्यात येणाऱ्या तीन नायिका पाहायला मिळणार आहे. गौतम कोळी या मालिकेचे दिग्दर्शक आहेत.
कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी न पटणाऱ्या भूमिका देखील केल्या होत्या; परंतु आता त्यांनी फक्त निवडक भूमिका करण्याचे ठरविले आहे.