Friday, July 4, 2025

कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे विरुद्ध पावसाळी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे विरुद्ध पावसाळी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

मुंबई: सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात  कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal kamra) आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) या दोघांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव मंजूर झाला आहे. गतविधीमंडळात या दोघांवर हक्कभंग कारवाई दाखल करण्याची मागणी जोर धरली होती, जो हंगामी विधीमंडळात मंजूर झाला आहे. त्यामुळे या दोघांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.


कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या नया भारत या कॉमेडी शोमधून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विडंबनात्मक एक गाणं तयार करत, त्याचा व्हिडिओ शूट केला होता. त्याचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले. तर, दुसरीकडे उबाठा गटाकडूनदेखील हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. सुषमा अंधारेंनी देखील व्हिडिओ बनवला होता. त्यामुळे, या दोघांविरुद्ध हक्कभंग दाखल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, त्यास मंजुरी देण्यात आली आहे.



कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांना नोटिस पाठवणार


कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग मंजूर झाला आहे. त्यानुसार, आता कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंना सोमवारी नोटीस काढली जाणार आहे.


कुणाल कामराने जिथं हे गाणं गायलं, त्या स्टुडिओची काही शिवसैनिकांनी तोडफोड केली. तसेच, कामराविरुद्ध मुंबईतील काही पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील कुणाल कामराचं हे गाणं म्हटल्याचा व्हिडिओ समोर आला. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात देखील उमटले. त्यानंतर कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात विधानपरिषदेचे सदस्य आमदार प्रविण दरेकर यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. जो आता स्वीकारण्यात आला आहे.



हक्कभंग दाखल करताना काय म्हणाले दरेकर? 


सुषमा अंधारे यांनी बोलताना वापरलेली खालच्या पातळीवरील भाषा आणि कुणाल कामराने हेतूपूरस्पर उपमुख्यमंत्री यांच्यावर वैयक्तिक आणि उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एकप्रकारे सभागृहाचा अवमान करणारी आहे. त्यामुळे कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग मांडण्यास अनुमती द्यावी, अशी विनंती प्रवीण दरेकर यांनी केली होती. त्यावर सभापती राम शिंदे यांनी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडं योग्य त्या कारवाईसाठी पाठवित असल्याचे जाहीर केले होते.

Comments
Add Comment