
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे ८ मार्च २०२४ च्या शासन आदेशानुसार सक्तीचे झाले आहे. राज्यातील सर्व शाळांत यासंबंधीचा आदेश अंमलात आला आहे. हिंदी सक्तीची करण्याचा आदेश रद्द करणारा जीआर गुरुवारी काढला गेला.
तिसर्या भाषेच्या सक्तीवरून राज्यातून आलेला विरोध लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसर्या भाषेसंदर्भातील सर्व शासन निर्णय रद्द केला आहे. इयत्ता पहिली व दुसरीसाठी विषयनिहाय वेळेचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार तासिकांमधून तिसरी भाषा संपूर्णपणे वगळण्यात आली आहे. या तिसर्या भाषेच्या आठवड्यातील पाच तासिकांसाठी वर्ग केलेला आठवड्यातील २ तास ५५ मिनिटांची वेळ प्रथम भाषा, कला, क्रीडा आणि कार्यानुभव या विषयांच्या तासिकांमध्ये वाढवण्यात आली आहे.
आधीच्या वेळापत्रकात पहिल्या भाषेसाठी संपूर्ण आठवडाभरात ३५ मिनिटांच्या १५ तासिका होत्या. त्यात एका तासिकेची वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय कला व हस्तकला विषयासाठी पूर्वीच्या ४ तासिकांऐवजी ३५ मिनिटांच्या ६ तासिका ठेवत ७० मिनिटे वाढवण्यात आली आहेत. क्रीडा आणि कार्यानुभव या दोन्ही विषयांसाठी पूर्वी ३५ मिनिटांच्या २ तासिका होत्या. आता त्यात एकेक तासिका वाढवण्यात आली आहे.३५ मिनिटांच्या ३ तासिकांमध्ये उपचारात्मक अध्यापन, स्पर्धा परीक्षा तयारी, सराव असे उपक्रम घेता येणार आहेत. या तासिका कोणत्या विषयांसाठी वापरायच्या, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य शाळांना देण्यात आले आहे.