Friday, July 4, 2025

एकाच महिन्यात ९ लाख लाडक्या बहिणींचा प्रवास

एकाच महिन्यात ९ लाख लाडक्या बहिणींचा प्रवास

विरार (प्रतिनिधी) : महापालिकेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना लाडक्या बहिणींना चांगलीच पसंत आली. पहिल्याच महिन्यात ९ लाख १५ हजार १७५ लाडक्या बहिणींनी या परिवहन सेवेचा लाभघेतला असून, सवलतीच्या दरात प्रवास करायला मिळत असल्यामुळे महिलांनी महापालिका प्रशासना प्रती समाधान व्यक्त केले आहे. या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी १८,८५६ लाडक्या बहिणींच्या प्रवासाचा आकडा १० जूननंतर वाढला, ३० जून पर्यंत ३७ हजार होता.


वसई-विरार महानगरपालिकेने १ जूनपासून महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत महिलांना तिकीट दरामध्ये ५० टक्के सवलत दिली. महापालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या ३७मार्गावर १५४ बसच्या माध्यमातून ही सेवा पुरविली जात आहे. वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रांमध्ये आता महिला प्रवाशांना १० रुपये ऐवजी ५ रुपये आणि १५ रुपयां ऐवजी ८रुपये देऊन शहरात प्रवास होत असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना १ जून म्हणजेच रविवारपासून प्रारंभ करण्यात आली. रविवार असल्याने पहिल्या दिवशी महिला प्रवाशांची संख्या कमी दिसून आली. पहिल्या दिवशी १८ हजार ८५६ महिलांनी मनपाच्या परिवहन सेवेचा लाभ घेतला. महिला प्रवाशांचा आकडा वाढत गेला. २ जून रोजी २५ हजार ११२, असलेली महिला प्रवाशांची संख्या पाचव्या दिवशी ३० हजार ३९२ वर पोहचली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुद्धा या योजनेचा प्रचार करण्यात आला.


त्यामुळे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. १० जून पासून ३० जून पर्यंत रविवार वगळता महिला प्रवाशांची संख्या ही ३० हजारावर ते ३७ हजाराहून अधिक अशीच राहिली. महिला प्रवाशांना सवलत मिळत असल्याने या बससेवेचा लाभमहिला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात घेतलाजात आहे.


वसई-विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रात राहणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणींना प्रवासात थोडा का होईना पण आर्थिक दिलासा मिळावा म्हणून महापालिकेकडे या उपक्रमाबाबत पाठपुरावा केला. महिला प्रवाशांचा प्रतिसाद पाहता, समाधान वाटत असून, भविष्यात महिलांच्या हितासाठी योजना राबविण्यावर भर राहील. स्नेहा दुबे पंडित, आमदार वसई

Comments
Add Comment