
मुंबई : श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गतिमंद विद्यार्थ्यांसाठी लालबाग येथील जय हिंद सिनेमा गृहात आमिर खान दिग्दर्शित 'सितारे जमीन पर' या सिनेमाचा विशेष खेळ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला ४० गतिमंद विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष मुलांच्या भावविश्वाला उलगडणारा हा सिनेमा सर्वांनी मनापासून एन्जॉय केला.श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून गतिमंद मुलांसाठी विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. दरवर्षी परेल पोईबावाडी येथे या मुलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा ट्रस्टने गतिमंद विद्यार्थ्यांना सिनेमाच्या माध्यमातून आनंद देण्यासाठी 'सितारे जमीन पर' या चित्रपटाची निवड केली. हा सिनेमा विशेष मुलांच्या संवेदनशील विषयावर आधारित असून, त्यांच्या भावना आणि आव्हानांना प्रभावीपणे मांडतो.

कार्यक्रमादरम्यान, विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी सिनेमाचा पुरेपूर आनंद लुटला. सिनेमातील कथानक आणि संदेश यांनी सर्वांना विचार करायला भाग पाडले. श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सुमित पाटील यांनी यावेळी आपले मत व्यक्त करताना सांगितले, "गतिमंद मुलांचे भावविश्व समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याप्रती समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी असे सिनेमा खूप महत्त्वाचे आहेत.

भविष्यात अशा आणखी सिनेमांची निर्मिती व्हायला हवी."या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना केवळ मनोरंजनच नाही, तर त्यांच्या भावनांना आणि अनुभवांना समाजाशी जोडण्याचा एक अनोखा प्रयत्न केला. जय हिंद सिनेमा गृहातील हा खेळ गतिमंद मुलांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे विशेष मुलांसाठी सातत्याने कार्यरत राहणार आहे.