
ग्रामीण भागामध्ये त्याचे प्रमाण नगण्य असायचे. पण अलीकडच्या काळात साथीच्या आजारांनी ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर शिरकाव केल्याने शहरी व ग्रामीण असा कोणताही भेदभाव आता शिल्लक राहिला नाही. डासांपाठोपाठ पावसाळ्यात तलावातून शहरी व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांतून दूषित पाणी येत असल्यानेही साथीच्या आजाराला पोषक वातावरण उपलब्ध होते. तलावक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे चिखल व गाळाचे पाणीही जलवाहिन्यांतून आपल्या घरामध्ये येते. यामुळे कधी पिवळसर, कधी तांबूस, कधी लालसर रंगाचे पाणी िदसून येते. त्यातच कोठे जलवाहिन्या फुटल्यास तेथील माती, चिखलाचाही समावेश त्यात होत असतो. दूषित पाण्याची समस्या अलीकडच्या काळात वाढीस लागल्याने साथीच्या आजारांचा उद्रेक होऊ लागला आहे. राज्याला साथीच्या आजाराचा विळखा पडत असून, गेल्या साडेपाच महिन्यांत मलेरियाचे ४४७१ रुग्ण तर डेंग्यूचे रुग्ण २०३१ आढळले आहेत. तर चिकनगुनियाचे ९०० रुग्ण आढळले. शहरी भागातील मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रात आहेत. मुंबईसोबत ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल-उरण, भाईंदर परिसरातही साथीच्या आजारांचा उद्रेक सध्या झाला आहे. ज्या ठिकाणी खाडी किनारा आहे, तेथे डासांच्या उद्रेकास पोषक वातावरण मिळाल्याने साथीच्या आजारांना पोषक वातावरण तयार होत असते. गलिच्छपणा, साचलेले पाणी, तुंबलेली गटारे-नाले या ठिकाणीही डासांचा फैलाव झालेला असतो. साथीच्या आजारांमध्ये अन्य आजारांच्या तुलनेत मलेरियाचे प्रमाण अधिक असते.
यंदा राज्यात मान्सून महिनाभर आधी दाखल झाल्याने साथीच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. राज्यातील जिल्ह्यामध्ये गडचिरोलीमध्ये ११८०, रायगडमध्ये २११, गोंदियात २८ रुग्ण आढळले आहेत. महापालिकांचा विचार करता मुंबई २३१४, पनवेलमध्ये २१६, ठाण्यात १२८ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे पालघरमध्ये १३३, पुणे १२८, अकोला ११९, सिंधुदुर्ग ६६ रुग्ण आढळले. महापालिकांमध्ये मुंबईनंतर नाशिक ३९५, अकोला १३९ , नाशिक १३२, ठाणे ६३ रुग्ण आढळले. राज्यामध्ये मलेरियाचे रुग्ण सामान्यत: पावसाळ्याच्या म्हणजेच जुलै ते ऑक्टोबर तसेच डेंग्यूचे रुग्ण सामान्यत: ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यांत वाढतात. मुख्य कारण म्हणजे तापमान, आर्द्रता आणि अधूनमधून पडणारा पाऊस यांसारख्या हवामानाच्या परिस्थितीमुळे डासांची पैदास होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते, मात्र यंदा जानेवारीपासून रुग्ण आढळत आहेत. राज्यात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने महाराष्ट्राच्या आरोग्य विभागावर कमालीचा ताण पडला आहे. राज्यात ९०० चिकनगुनियाचे रुग्ण आढळले. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येत आहे. पुणे १०४, अकोला ८५, पालघर ६९, सिंधुदुर्ग ४४, महापालिकानिहाय मुंबई ११९, अकोला १०१, सांगली मिरज २४ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात लेप्टोचे एकूण १२१ रुग्ण आढळले आहेत, तर स्क्रब टायफसचे १८ आणि जपानी तापाचे ३ रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूचे एकूण २०४ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक ४२ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सोलापूरमध्ये ३६, पुण्यात ३१, नागपूरमध्ये २७, ठाण्यात २१, छत्रपती संभाजीनगरमध्ये १९, कोल्हापूरमध्ये १७ रुग्ण आढळले आहेत. राज्यात गेल्या १३५ दिवसांत १००४ रुग्ण आढळले आहेत, ज्यात कॉलराचे २२, गॅस्ट्रोचे ३२, अतिसाराचे ४१४, सांध्याचे ५१३ आणि टायफॉइडचे २२ रुग्ण समाविष्ट आहेत. राज्यात आतापर्यंत बर्ड फ्लूचे ७३ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईमध्ये साथीच्या आजारांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात आढळलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत यंदा जूनच्या पंधरा दिवसांतील रुग्ण अधिक असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच राज्याला डेंग्यूच्या आजाराने विळखा घातला आहे. शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याने राज्याच्या आरोग्य विभागाची झोपच उडाली आहे.
डेंग्यूचा डंख वाढल्याने पालिका प्रशासनही सतर्क झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीची ही रुग्णसंख्या चिंताजनक असल्याचे राजाची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. डेंग्यू हा सर्वांत मोठ्या प्रमाणावर डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हवामान बदल, जलद शहरीकरण आणि लोकसंख्यावाढीमुळे तो वेगाने पसरत आहे. प्रादुर्भाव हा सहसा हंगामी असतो. पावसाळ्यात आणि नंतरच्या काळात रुग्णसंख्या वाढत असते. जागतिक आरोग्य संघटनेने डेंग्यूला सार्वजनिक आरोग्यासाठी असलेल्या टॉप टेन धोक्यांपैकी एक म्हणून वर्गीकृत केले आहे. महापालिका क्षेत्रात मुंबईमध्ये डेंग्यूचे रुग्ण सर्वाधिक आहेत.