
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा मृत्यूही झाला आहे. मुंबई महापालिकेने महिनाभरात याबाबत मोहीम राबवून सर्व कबुतरखाने तात्काळ बंद करावेत त्याचबरोबर कबुतरांमुळे होणा-या आजारांबाबत लोकांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबई महापालिकेला दिले आहेत. मुंबईत ५१ कबुतरखाने असून त्यातील काही कबुतरखाने हे शंभर दीडशे वर्षे जुने आहेत. यातील काही बंद आहेत तर काही सुरू आहेत.
दादरमधील कबुतरखान्याचा पुरातन वास्तू जतन श्रेणीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मात्र, हे सर्व कबुतरखाने रहिवासी तसेच मुंबईकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक बनले आहेत. त्यामुळे दादर कबुतरखानासह मुंबईतील कबुतरखाने बंद करा, अशी मागणी मनीषा कायंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला केली. त्यावर मंत्री सामंत यांनी उत्तर दिले. दरम्यान, सदस्य चित्रा वाघ यांनीही कबुतरांच्या विष्ठेमुळे त्यांच्या मामीचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पालिकेच्या के-पश्चिम विभाग कार्यालयाकडे हा कबुतरखाना बंद करण्यासाठी पाठपुरावा केला होता. दादरमधील कबुतरखान्याबद्दल तक्रारी आल्यानंतर मुंबई महापालिकेने तो दोन वर्षे बंद ठेवला होता. सरकारने या कबुतरखान्याच्या आजूबाजूच्या बिल्डिंगची समिती नेमून जो कोणी कबुतरांना खाणेपिणे टाकेल त्याची तसेच परिसरातील रहिवाशांची जनजागृती करण्यावर भर दिला होता.