Friday, July 4, 2025

इन्फ्लुएन्सर्स - द डिजिटल ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर

इन्फ्लुएन्सर्स - द डिजिटल ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर

स्वप्ना कुलकर्णी : मुंबई ग्राहक पंचायत



इन्फ्लुएन्सर्स म्हणून काम करणाऱ्या काही व्यक्ती असतात. सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्स यामध्ये फरक असतो. तथापि काही इन्फ्लुएन्सर्स हळूहळू सेलिब्रिटी या पदवीपर्यंत पोहोचतात. काय करतात ही मंडळी? त्यांच्या उपजीविकेसाठी रील बनवतात. त्यातून त्यांना रगड कमाई होत असते. बहुतेकदा या रील्सच्या माध्यमातून विविध उत्पादने, विचारधारा किंवा सेवा यांची वारेमाप भलामण असते. खरं तर यांच्याकडे जाहिरात म्हणूनच पाहिले जाते, थेट किवा छुपी.


आजच्या डिजिटल युगात इन्फ्लुएन्सर्स हे खूप महत्त्वाचे ठरतात. ग्राहकांच्या मतांवर आणि खरेदीच्या निर्णयांवर ते मोठा प्रभाव टाकत आहेत. लाखो फॉलोअर्स त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देत असतात, त्यामुळे ते आपल्या विचारांवर आणि वर्तनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. जाहिरातीमधील दाव्यांचा खरेपणा पडताळून बघण्याचे काम, Advertising Standards Council of India-आस्की–सातत्याने करीत असते. नुकताच त्यांचा २०२४-२५ वर्षाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. कित्येक जाहिरातींमध्ये केलेले दावे पुराव्यानिशी सिद्ध करण्यास सांगितले असता, उत्पादक त्या दाव्यांची पुष्टी करू शकले नाहीत. आस्कीने केलेल्या तपासणीत ९४% जाहिरातींमध्ये बदल होणे आवश्यक होते. सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम, एक्स, व्हाॅट्सअ‍ॅप आणि इतर अनेक प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर जाहिराती केल्या जातात.

ॲानलाइन खरेदी किंवा उत्पादकाचे संकेत स्थळ अशा ठिकाणी सुद्धा कित्येक वेळा खोट्या/विकत घेतलेल्या प्रतिक्रिया, बनावट प्रतिमा आणि अफाट/अवाजवी फायद्याचे फसवे दावे केले जातात. डिजिटल माध्यमे जास्त प्रचलित होत असताना आणि अनेक उपभोक्ते विविध प्लॅटफॉर्मवर जाहिरात पाहत असताना, जाहिरात आणि मुख्य विषय यामधील सीमारेषा अस्पष्ट होत चालल्या आहेत. त्यांच्या क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून ओळख निर्माण करतात आणि त्यांच्या प्रेक्षकांशी विश्वासाचं नातं तयार करतात. जेव्हा ते एखाद्या उत्पादनाची किंवा सेवेची शिफारस करतात, तेव्हा त्यांचे फॉलोअर्स त्या गोष्टीवर अधिक विश्वास ठेवतात. वैयक्तिक अनुभव शेअर करतात, ज्यामुळे त्यातील कंटेंट अधिक खरीखुरे वाटते. त्यांचे प्रेक्षकांशी भावनिक नातं तयार करतात. त्यामुळे जेव्हा ते एखादं उप्तादन प्रमोट करतात, तेव्हा त्यांचे फॉलोअर्स ते लक्षात ठेवतात आणि त्या ब्रँडबद्दल सकारात्मक भावना निर्माण होते.

विविध पद्धतींनी ब्रँडचे प्रमोशन करतात, उत्पादनांचे परीक्षण (रिव्ह्यू), अनबॉक्सिंग व्हिडीओ, ट्युटोरियल्स किंवा डेमो अशा पद्धती वापरतात. त्यांच्या फॉलोअर्सशी एक विश्वासाचं नातं निर्माण करतात. त्यामुळे त्यांची शिफारस ही सामान्य जाहिरातींपेक्षा जास्त प्रभावी वाटते. अनेकवेळा ब्रँडसोबत भागीदारी करून नव्या उत्पादनांची ओळख करून देतात. गिवअवे Giveaway) स्पर्धा घेतात. इन्फ्लुएन्सर्सना त्यांची लोकप्रियता, प्रभाव आणि सहभाग यानुसार उत्पादनाच्या/सेवेच्या प्रमोशनसाठी पैसे दिले जातात. हे पूर्णतः व्यावसायिक करारांवर अवलंबून असते. प्रत्येक पोस्ट, व्हिडीओ किंवा प्रचार मोहिमेसाठी ठरावीक पैसे मिळतात. काही वेळा उत्पादक ब्रँड इन्फ्लुएन्सरला उत्पादन मोफत देतो आणि त्याच्या बदल्यात प्रचार करावा लागतो. इन्फ्लुएन्सरच्या लिंकवरून खरेदी झाली, तर त्यांना त्यावरून टक्केवारीत कमिशन मिळते. काही मोठ्या इन्फ्लुएन्सर्सना दीर्घकालीन करार किंवा मासिक मानधन मिळते. डिजिटल जाहिरातीत इन्फ्लुएंन्सर्ससाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे तपशील आस्कीने (ASCI) प्रसिद्ध केले आहेत. ब्रँडशी असलेली आर्थिक-व्यावसायिक जोडणी स्पष्ट करणे. Disclosure) म्हणजेच ब्रँडकडून मिळणारे फायदे ग्राहकांना समजेल अशा भाषेतून लेखी-तोंडी जाहीर करणे. उदा. Ad, sponsored, partnership इत्यादी. यू-ट्यूबसाठी तर includes paid promotion असे वेगळे स्पष्ट करायला हवे. ⁠इन्फ्लुएन्सर्सनी उत्पादनाबद्दल अतिशयोक्ती करू नये. दावे पुराव्यानिशी करावेत. प्रतिबंधित वस्तूंची जाहिरात करू नये. ⁠इन्फ्लुएंन्सर्सनी स्वतः हे उत्पादन वापरलेले असावे, त्याची पूर्ण माहिती आणि अनुभवही असावा. ⁠इन्फ्लुएन्सर जरी कृत्रिम-बुद्दिमत्तेद्वारे निर्मित (AI) असला तरी वरील सर्व नियम लागू होतात. वरील नियमांचे उल्लंघन केल्यास पहिल्या चुकीसाठी १० लाख तर वारंवार केलेल्या चुकीसाठी ५० लाखांपर्यंत दंड आहे.

जशी इन्फ्लुएंन्सर्ससाठी नियमावली आहे तशीच ग्राहकांसाठी ही काही अधिकार आणि जबाबदाऱ्या आहेत. ग्राहकांनी हे पक्के जाणून असावे की इन्फ्लुएन्सर्सना जाहिरातीसाठी पैसे दिलेले असतात, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया पूर्णतः प्रामाणिक असतीलच असे नाही.· उत्पादन खरेदी करण्याआधी इतर ग्राहकांचे अनुभव वाचा, ब्रँड तपासा. ग्राहक म्हणून ब्रँड विषयी सर्व माहिती मिळविण्याचा अधिकार आहे, तो वापरा, तिथे ‘जाऊ दे’ वृत्ती नको. भ्रामक, खोट्या, आरोग्यविषयी अप्रमाणिक दावे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींची तक्रार करता येते, तशी करा. जाहिरातदारांनी दिलेल्या लिंक्सवर आर्थिक किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये. लिंक अधिकृत असल्याची खात्री करावी. ग्राहकांनी उत्पादन खरेदी करताना काही गोष्टींची दक्षता घ्यावी. ASCI इन्फ्लुएन्सर्सवर नियंत्रण कसे ठेवते? डिस्क्लोजर लेबल्स (प्रकटन टॅग) - इन्फ्लुएन्सर्सनी जाहिरातीसाठी पैसे घेतल्यास पोस्टमध्ये स्पष्ट टॅग लावणे आवश्यक आहे.

जे स्पष्ट आणि सहज लक्षात येणारे असावे. तसेच ते पोस्ट किंवा कॅप्शनच्या पहिल्या दोन ओळीत प्रकटन झालेले असावे. व्हिडीओत किमान ३ सेकंद हे टॅग स्क्रीनवर दिसायला हवेत. ऑडियोत हे स्पष्टपणे उच्चारले गेले पाहिजेत. ASCI नियमांचे उल्लंघन ओळखते. AI-आधारित तंत्रज्ञान वापरून, सोशल मीडिया स्कॅन करून तसेच ग्राहकांच्या तक्रारींवरून कळते. ASCI इन्फ्लुएन्सर/ब्रँडला नोटीस पाठवतात.· चुकीची जाहिरात ASCI च्या संकेतस्थळावर उघडपणे प्रदर्शित केली जाते. वारंवार उल्लंघन झाल्यास सरकारी यंत्रणेकडे तक्रार केली जाऊ शकते. ग्राहक १८००-११-४००० या कंज्युमर हेल्पलाईनवर किंवा consumerhelpline.gov.in या ईमेलवर किंवा https://tara.ascionline.in/auth/login ही लिंक वापरून तक्रार करू शकतात.
[email protected]
Comments
Add Comment