Friday, July 4, 2025

'थोरल्या बाजीरावांनी २० वर्षात ४१ लढाया जिंकल्या'

'थोरल्या बाजीरावांनी २० वर्षात ४१ लढाया जिंकल्या'
पुणे : थोरले बाजीराव पेशवे यांनी २० वर्षांत ४१ लढाया लढल्या आणि जिंकल्या. अपराजित राहिलेल्या थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमातून अनेकांना प्रेरणा मिळत राहील. त्यांचा पुतळा होण्यासाठी एनडीए हीच जागा योग्य आहे.



पुणे स्वराज्याचे उगमस्थान आहे. बाजीरावांच्या कार्याने पुढे अनेकांना प्रेरणा मिळत राहणार आहे. याच पुण्यात राहणाऱ्या टिळकांनी पुढे स्वराज्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला.



पुण्यातील खडकवासला येथील एनडीएमधील थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे अनावरण गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी अमित शाह यांनी थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या कार्याची महती सांगितली. 'काही युद्धनीती कालबाह्य होत नाहीत. सध्याची युद्धनीती आणि बाजीरावांची युद्धनीती यामध्ये साम्य आहे. बाजीरावांनी २० वर्षांत ४१ लढाया लढून त्या सर्व जिंकल्या. पराभव निश्चित मानल्या जाणाऱ्या लढाया बाजीरावांनी जिंकल्या. त्यामुळे त्यांच्यासारखा सेनापती दुसरा नाही. त्यांचे संपूर्ण आयुष्य लढाया लढण्यात गेले. त्यांनी मिळविलेला विजय कल्पने पलिकडचा होता;' असे केंद्रीय गृहंत्री अमित शाह म्हणाले.

मराठा साम्राज्याने प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्याचे कार्य पुढे नेले. शेजारच्या संस्थांनातही प्रशासन उत्तम राबविले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची कल्पना केली, तेव्हा भूगोल वेगळा होता. शिवरायांच्या वारसांनी स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. शिवरायांनंतर संभाजी महाराज, ताराराणी यांनी परंपरा पुढे नेली. बुंदेलखंड, तंजावर, गुजरातपासून अफगाणिस्तान, अटक, कटकपर्यंत स्वराजाचा विस्तार केला. निजामविरोधातील पालखेडचा मराठ्यांचा विजय अविस्मरणीय आहे. जेव्हा नैराश्य येते त्यावेळी छत्रपती शिवराय आणि बाजीरावांचा इतिहास आठवणे हा उत्तम उपाय आहे, असेही केंद्रीय गृहंत्री अमित शाह म्हणाले.

भारतीय नायकांच्या शौर्याचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू

थोरले बाजीराव पेशवे पराक्रम आणि वेगाच्या जोरावर बाजी मारत होते. ज्या काळात प्रवासाच्या सोयी आजच्या तुलनेत कमी होत्या त्या काळात थोरल्या बाजीराव पेशव्यांचे सैन्य दररोज किमान आठ ते दहा किमी. आणि काही वेळा त्यापेक्षा जास्त वेगाने प्रवास करत शत्रूवर हल्ला करायचे. इंग्रजांनी आणि काही स्वकीयांनी आपल्या नायकांवर अन्याय केला. हिंदवी स्वराज्य आणि मराठ्यांचा इतिहास डिलिट करून टाकला. मुघलानंतर इंग्रज आले. त्यामुळे आपल्याला आपल्याच अनेक महानायकांचा विसर पडला. परंतु आज देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इतिहासातील अनेक नायकांचा, योद्ध्यांचा, स्वातंत्र्यसेनानींचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा