
नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका
मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक कायद्यांच्या विरोधात मंगळवारपासून वाहतूकदारांचे बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू झाला आहे. या संपात नवी मुंबईमधील ७० हजार अवजड वाहनांचा समावेश आहे. ई-चलन कारवाई थांबवावी, आधी केलेल्या कारवाईचा दंड माफ करावा, क्लिनर अनिवार्य असल्याचा निर्णय मागे घ्यावा, अशा मागण्यांसाठी सर्व अवजड वाहतूक करणाऱ्या संघटनांनी संप सुरू केला असल्याची माहिती वाहतूकदार प्रतिनिधी संजय ढवळे यांनी दिली आहे.
भारताची सर्वांत मोठी वाहतूक संस्था ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली, बस अँड कार कॉन्फिडरेशन नवी दिल्ली, महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक महासंघ, स्कूलबस संघटना महाराष्ट्र राज्य, इंटरस्टेट कंटेनर असोसिएशन महाराष्ट्र, एलपीजी वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य, अशा जवळपास सगळ्याच संघटनांचा पाठिंबा आहे. संपाचा सर्वात मोठा फटका आयात निर्यातदारांना बसला असून वारकरी, शाळकरी मुलांना बसण्याची शक्यता आहे. कारण मुलांच्या शाळा आता सुरू झाल्या आहेत, तर दुसरीकडे आषाढी वारीदेखील सुरू आहे.
ई-चलन पद्धतीमुळे वाहतूकदारांमध्ये असंतोष
ई-चलन पद्धतीमुळे वाहतूकदरामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. आधीच व्यवसायात स्पर्धा, स्पर्धेमुळे भाड्यात कपात आणि या-ना-त्या प्रकारे उदा. रोड टॅक्स, टोल टॅक्स, इन्कम टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, एज्युकेशन टॅक्स, ग्रीन टॅक्स, सर्विस टॅक्स, जीएसटी असे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कर वाहतूकदारावर लादले जातात. त्याचबरोबर सध्या सुरू असलेला ई-चलनचा बडगा हे ओझे आता वाहतूकदारांच्या डोईजड झाले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवसाय मरणासन्न अवस्थेत गेला असून शेवटच्या घटका मोजत आहे.