
शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था ( शिर्डी )च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी बुधवार दि.०९ जुलै २०२५ ते शुक्रवार दि.११ जुलै २० २५ या काळात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत असून, या उत्सवात सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.
गुरु-शिष्य परंपरा फार प्राचीन आहे.आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. श्री साईबाबांच्या ह्यातीतही गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठ्या उत्साहात साजरी केली जात असे. त्यामुळे या दिवसाला आजही अनन्य साधारण महत्व आहे. श्री साईबाबांवर श्रध्दा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येवून समाधीचे दर्शन घेतात व या उत्सवास हजेरी लावतात. याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून शुक्रवार दि.०९ जुलै रोजी पहाटे ५.१५ वाजता श्रींची काकड आरती,५.४५ वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक,० ६ वाजता व्दारकामाई श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण सुरुवात, ६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ० ७ वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३ ० वाजता श्रींची माध्यान्ह आरती,दुपारी १.३ ० ते ३.३ ० निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम,सायंकाळी ० ४ ते ० ६ या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सायं.०७ वाजता श्रींची धुपारती होईल.
रात्री ९ .१५ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक होणार असून पालखी मिरवणूक परत आल्यानंतर रात्री १० वाजता श्रींची शेजारती होईल. या दिवशी पारायणासाठी व्दारकामाई रात्रभर उघडी राहील. गुरुवारी मुख्य दिवशी दि. १० जुलै रोजी पहाटे ५. १५ वाजता श्रींची काकड आरती, ५.४५ वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०७ वाजता श्रींची पाद्यपुजा, सकाळी १० ते १ २ कलाकारांचे कार्यक्रम, दुपारी १२.३ ० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ०४ ते ० ६ या वेळेत कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ० ७ वाजता श्रींची धुपारती होईल.रात्री ९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून या दिवशी श्रींची शेजारती व दि.११ जुलै रोजीची श्रींची काकड आरती होणार नाही. या दिवशी रात्री १० ते पहाटे ०६ वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन ( हजेरी ) कार्यक्रम मंदिरा शेजारील स्टेजवर होईल.
उत्सवाच्या सांगता दिनी शुक्रवार दि.११ जुलै पहाटे ०६ वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ६ .५० वाजता श्रींची पाद्यपुजा, सकाळी ०७ वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी १० ते १२ दरम्यान गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती होणार असून सायंकाळी ०७ वाजता श्रींची धुपारती होईल तसेच रात्री १० वाजता शेजारती होईल.
उत्सवाच्या निमित्ताने व्दारकामाई मंदिरात प्रथम दिवशी होणाऱ्या श्री साईसच्चरिताच्या अखंड पारायणासाठी जे साई भक्त इच्छुक आहेत त्यांनी आपली नावे दि.८ जुलै रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५ .३० या वेळेत देणगी काऊंटरवर नोंदवावीत. सोडत पध्दतीने पारायणासाठी भक्तांची नावे सायंकाळी ५.३५ वाजता निश्चित करण्यात येतील.