Thursday, July 3, 2025

Sudhir Mungantiwar : हिंदीला विरोध आणि इंग्रजीला आलिंगन! महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ आमदारांना मराठी नकोशी

Sudhir Mungantiwar : हिंदीला विरोध आणि इंग्रजीला आलिंगन! महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ आमदारांना मराठी नकोशी

विधानसभा अध्यक्षांकडे इंग्रजी कामकाजपत्रिकेची मागणी


मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत कामकाजाची पत्रिका इंग्रजी भाषेत मिळावी, यासाठी ९ आमदारांनी विनंती केली असल्याची माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. आज (गुरुवार, दि. ३ जुलै) विधानसभेत इंग्रजी भाषेत असलेली कामकाजपत्रिका पाहून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ‘कामकाजपत्रिका इंग्रजीतून का?’, असा प्रश्न औचित्याच्या सूत्राच्या अंतर्गत उपस्थित केला. इंग्रजीशिवाय इतकीच अडचण येत असेल, तर त्या आमदारांना ब्रिटनच्या संसदेत पाठवा, असे उपरोधिक वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी या वेळी केले.



इंग्रजीतून कामकाजपत्रिका कशासाठी?


सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘विधानसभ नियमातील प्रावधानानुसार सभागृहातील कामकाज मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत चालवता येत असले, तरी अद्यापपर्यंत सभागृहात इंग्रजीतील कामकाजपत्रिका मी पाहिलेली नाही. एकिकडे मराठीला अभिजात भाषा करायची आणि ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना हिंदीची संधी असतांना इंग्रजीतून कामकाजपत्रिका कशासाठी? मराठी समजायला अडचण असेल, तर कामकाजपत्रिका हिंदीतून काढावी. हिंदीला विरोध आणि इंग्रजीला आलिंगन, हे धोरण चुकीचे आहे.



इंग्रजीशिवाय अडचण असेल तर ब्रिटनच्या संसदेत पाठवावे


महाराष्ट्राच्या विधानसभेचे नियमावली करतांना त्या वेळी इंग्रजीचा प्रभाव असेल; परंतु याविषयी नियम समितीची बैठक घेऊन कामकाजातील इंग्रजी शब्द काढून टाकावेत. मराठी भाषा शिकलीच पाहिजे. एखाद्याला मराठी शिकायला खूपच अडचण असेल, त्यांनी हिंदी शिकावी; परंतु इंग्रजीशिवाय खूपच अडचण असेल, तर त्यांना ब्रिटनच्या संसदेत पाठवावे. एकीकडे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांना राज्यात मराठी शिकायला लावले जाते; परंतु ज्यांना मराठी येत नाही त्यांच्याकरता हिंदीची संधी असतांना इंग्रजीतून कामकाजपत्रिका कशाकरिता?’’, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. सुधीर मुनगंटीवार यांच्या औचित्याच्या सूत्रावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठी आणि इंग्रजी या भाषांमध्ये कामकाजपत्रिका काढतो, अशी माहिती सांगून इंग्रजीतून कामकाजपत्रिकेसाठी आमदारांनी विनंती केल्याचे म्हटलं

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >