
कोथरूड येथे राहणाऱ्या केदार सोमण यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही पोस्ट व्हायरल होऊ लागताच मनसे प्रवक्ते हेमंत संभूस यांच्या अध्यक्षतेखाली केदार सोमण यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी कारवाई केली.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी आधी सोमण यांच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि दार उघडण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण सोमण यांनी घराचे दार उघडले नाही. तोपर्यंत कोथरूडच्या इंद्रधनु सोसायटीत गडबड सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दूर केले. रस्त्यावर थांबवले. यानंतर पोलिसांनी केदार सोमण यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस केदार सोमण यांना व्हॅनमध्ये घेऊन जात होते त्यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. पण पोलिसांनी तातडीने केदार सोमण यांना घटनास्थळापासून दूर नेले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.