Thursday, July 3, 2025

PM Narendra Modi Ghana Visit : अभिमानास्पद! पंतप्रधान मोदींना घानाचा सर्वोच्च सन्मान, 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' प्रदान

PM Narendra Modi Ghana Visit : अभिमानास्पद! पंतप्रधान मोदींना घानाचा सर्वोच्च सन्मान, 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' प्रदान

घाना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ देशांच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे, या दरम्यान ते ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होतील. आज मोदींनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन द्रमानी महामा यांची भेट घेतली. यावेळी महामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान केला. ‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ (The Officer of The Order of the Star of Ghana ) असं या पुरस्काराचं नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रशासकीय नेतृत्व आणि जागतिक स्तरावर नावाजलेलं नेतृत्व याप्रीत्यर्थ हा सन्मान करण्यात आल्याचं घाना सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यांच्या भेटीदरम्यान, भारत आणि घाना यांनी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी अनेक करारांवर स्वाक्षरी केली.



नरेंद्र मोदींनी काय म्हटलंय या सन्मानाबाबत?


The Officer of The Order of the Star of Ghana या पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंदर्भात सविस्तर पोस्ट केली आहे. या पोस्टबरोबर त्यांनी हा सन्मान त्यांना बहाल केला जात असतानाचे फोटोही शेअर केले आहेत. आपल्या पोस्टमध्ये मोदींनी घाना सरकार व जनतेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.





“हा पुरस्कार मला बहाल केल्याबद्दल मी घानाच्या जनतेचे व सरकारचे खूप खूप आभार मानतो. हा पुरस्कार मी दोन्ही देशांच्या तरुणाईच्या भवितव्याला, त्यांच्या महत्त्वाकांक्षांना, आपल्या समृद्ध सांस्कृतिक वैविध्याला आणि दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांना अर्पण करतो. हा पुरस्करा ही एक जबाबदारीदेखील आहे. दोन्ही देशांमधील घट्ट मैत्री अधिकाधिक वृद्धिंगत करण्याची ही जबाबदारी आहे. भारत नेहमीच घानासोबत उभा राहील आणि एक मित्र आणि विकासातील भागीदार म्हणून नेहमीच घानाला मदत करत राहील”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घानाच्या सरकारला आश्वासन दिलं आहे.





घाना पुरस्कार काय आहे?


हा पुरस्कार घाना सरकारकडून दिला जाणारा दुसरा महत्त्वाचा राष्ट्रीय पुरस्कार आहे. ज्या व्यक्तींनी देशासाठी कोणत्याही स्वरूपात एखादी अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली असेल, अशा नागरिकाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. घानाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यामध्ये अशा पुरस्कारार्थींचा आदर-सत्कार केला जातो. वास्तविक २३ जून २००८ पर्यंत हा घानाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार होता. मात्र, या दिवशी ‘ग्रँड ऑर्डर ऑफ द स्टार अँड इगल्स ऑफ घाना’ हा सर्वोच्च पुरस्कार देण्यास घाना सरकारने सुरुवात केली.







नरेंद्र मोदींचा ५ देशांचा दौरा


पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ५ देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. गेल्या १० वर्षांतला त्यांचा हा सर्वात मोठा दौरा असून तो तब्बल ५ आठवडे असणार आहे. घानापासून मोदींनी आपल्या या दौऱ्याला सुरुवात केली असून त्यानंतर त्रिनिदाद अँड टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबियाचा दौरा ते करणार आहेत. येत्या ६ व ७ जुलै रोजी ब्राझीलच्या रिओ दी जानेरिओ येथे होणाऱ्या ‘ब्रिक्स शिखर परिषदे’लाही पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान यावर्षीच्या प्रवासी भारतीय दिवसाच्या प्रमुख पाहुण्या असलेल्या राष्ट्रपती क्रिस्टीन कार्ला कांगालू आणि अलीकडेच दुसऱ्या कार्यकाळासाठी पदभार स्वीकारलेल्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांची भेट घेतील. नंतर, ते ब्यूनस आयर्सला जातील, ही ५७ वर्षांत भारतीय पंतप्रधानांची अर्जेंटिनाची पहिली द्विपक्षीय भेट असेल.

Comments
Add Comment