Thursday, July 3, 2025

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने
नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यात भूदल, नौदल आणि हवाई दलासाठी आर्मर्ड रिकव्हरी व्हेईकल्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे यांचा समावेश आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १० संरक्षण साहित्य खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि भारतीय सैन्य दलांना कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी कायम सुसज्ज ठेवणे या उद्देशाने ही खरेदी होणार आहे. या खरेदीमुळे शत्रूचा वेगाने आणि प्रभावीरित्या प्रतिकार करण्याची भारतीय सैन्याची क्षमता आणखी वाढणार आहे. भारताचे हवाई संरक्षण आणखी मजबूत होणार आहे. संरक्षण साहित्य निर्मिती ते सैन्याला होणारा पुरवठा यासाठीच्या साखळीचे व्यवस्थापन आणखी प्रभावीरित्या होणार आहे.

सैन्यासाठी खरेदी केल्या जाणार असलेल्या संरक्षण साहित्यात पाणसुरुंग शोधून निकामी करणारे जहाज, अत्याधुनिक शस्त्रे, पाण्याखाली प्रभावी काम करणाऱ्या यांत्रिक बोटी, उंचावर शस्त्र ठेवून वेगाने गोळीबार करण्यासाठी आवश्यक साहित्य अशा अनेक आधुनिक संरक्षण साहित्यांचाही समावेश आहे. यामुळे नौदलाच्या जहाजांचे तसेच व्यावसायिक जहाजांचे रक्षण करण्यास मदत होणार आहे.
Comments
Add Comment