Thursday, July 3, 2025

सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण योजनेस अपात्र

सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण योजनेस अपात्र
मुंबई : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण योजनेस अपात्र ठरणार आहेत. ज्या सरकारी महिला कर्मचारी आधी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या, त्यांना यापुढे सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही. राज्यातील दोन हजार २८९ सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळले आहे. या सरकारी महिला कर्मचाऱ्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ही माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला आलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण योजनेस अपात्र असल्याचे सांगितले.

काय आहे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ?

महाराष्ट्र शासनाने ७ मार्च २०२४ रोजी राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर केले. या धोरणात महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' जाहीर करण्यात आली. ही योजना राज्यात २८ जून २०२४ पासून कार्यरत झाली. शासनाच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे सरकारकडून थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेसाठी महिलांकडून बँक खात्यांची माहिती मागवण्यात आली होती. आधार क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यातच पैसे हस्तांतरित केले जातात. यामुळे पारदर्शकता जपण्यास मदत होते.

योजनेचे मुख्य निकष

महाराष्ट्र निवासी महिला
वयाची अट - २१ ते ६५ वर्षे
विवाहीत, विधवा, अविवाहीत, घटस्फोटीत, निराधार महिला
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास संबंधित कुटुंबातील महिला योजनेसाठी पात्र ठरू शकते

योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करायची कागदपत्रे

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' या योजनेचा ऑनलाईन व्यवस्थित भरलेला फॉर्म
आधार कार्ड
बँक खात्याची माहिती
पासपोर्ट साइझ फोटो
अधिवास प्रमाणपत्र जन्म दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड (कोणतेही एक)
हमीपत्र

अपात्रतेचे निकष

कुटुंबातील सदस्य आजी किंवा माजी आमदार वा खासदार असल्यास संबंधित कुटुंबातील महिला योजनेसाठी अपात्र
सरकारी नोकरी करणारी महिला आणि आयकर भरणारी महिला योजनेसाठी अपात्र
कुटुंबातील सदस्याच्या नावे (ट्रॅक्टर वगळून) चार चाकी वाहन असेल त्या परिवारातील महिला अपात्र
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >