Thursday, July 3, 2025

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता भुयारी बोगद्याचा मार्ग मोकळा

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता भुयारी बोगद्याचा मार्ग मोकळा
मुंबई: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्या जुळ्या बोगद्यासाठी आवश्यक असलेली १९.४३ हेक्टर वनजमीन महापालिकेकडे वळती करण्यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्यता मिळाली आहे. त्यानुसार याची कार्यवाही महापालिकेमार्फत सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली आहे.

मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (लिंक रोड) प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सुमारे १२.२० किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये राबविला जात आहे. या संपूर्ण प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवासाची वेळ ७५ मिनिटांवरुन २५ मिनिटांवर येणार आहे. मुंबईकरांच्या प्रवास वेळेत आणि इंधनाची बचत होणार आहे. तसेच, कार्बन उत्सर्जनात दरवर्षी सुमारे २२ हजार ४०० टन इतकी घट होणार आहे.

दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जाणार

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या टप्पा ३(अ) अंतर्गत उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरीचे बांधकाम तर, टप्पा ३ (ब) मध्ये गोरेगांव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे १.२२ किलोमीटर लांबीचा तिहेरी मार्गिका असलेला पेटी बोगदा (कट अँड कव्हर) तसेच बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्या जुळ्या बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. जोड मार्ग आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी ६.६५ किलोमीटर आहे. हा जुळा बोगदा जमिनीखाली २० ते १६० मीटर खोल भागात आहे. प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जाणार आहेत.

१९.५ हेक्टर वनेतर क्षेत्रात वृक्षारोपण

जुळा बोगदा प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून बोगद्याच्या उभारणीसाठी १९.४३ हेक्टर राखीव वनक्षेत्र महापालिकेकडे वळती करण्यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांच्याकडून अंतिम मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन व पूर्ततेची कार्यवाही महापालिकेमार्फत सुरू करण्यात आली आहे. ही जमीन जरी महापालिकेकडे वळती करण्यात आली असली तरी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन जमिनीचा कायदेशीर दर्जा वने म्हणूनच कायम राहणार आहे. हे राष्ट्रीय उद्यान हद्द सुरु होण्यापूर्वी हा बोगदा जमिनीच्या पोटात जाईल आणि उद्यानाची हद्द संपल्यानंतर जमिनीच्या बाहेर येईल.

प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील कोणतीही झाडे / जमीन थेट बाधित होणार नाही. या वनीकरणाबदल्यात चंद्रपूर जिल्ह्यातील वसनविहीरा गावात १४.९५ हेक्टर आणि गोंडमोहाडी गावामध्ये ४.५५ हेक्टर अशा एकूण मिळून १९.५ हेक्टर वनेतर क्षेत्रात वृक्षारोपण व देखभाल केली जाणार असल्याची माहितीही अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली आहे.
Comments
Add Comment