बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्याबाहेर गोळीबार झाला. या गोळीबारात एक जण जखमी झाला. दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार झाला. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला आहे.
भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्याबाहेर असलेल्या रस्त्यावर गोळीबार झाला. या गोळीबारात अल्ताफ शेख जखमी झाला. अल्ताफला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस अल्ताफची डॉक्टरांच्या परवानगीने चौकशी करणार आहेत. गोळीबार प्रकरणी घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या लोकांकडे चौकशी सुरू आहे. तसेच संबंधित भागातील सर्व सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन गटात वाद का झाला ? गोळीबारापर्यंत प्रकरण का ताणले गेले ? गोळीबार कोणी केला ? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. सत्ताधारी आमदाराच्या घराजवळ गोळीबार झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.