Thursday, July 3, 2025

इंडोनेशियात ६५ जणांना घेऊन निघालेली फेरीबोट उलटली

इंडोनेशियात ६५ जणांना घेऊन निघालेली फेरीबोट उलटली
बाली : पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण असलेल्या इंडोनेशियात बालीजवळ ६५ जणांना घेऊन निघालेली फेरीबोट उलटली. या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण बेपत्ता आहेत. इतरांना वाचवण्यात आले आहे. बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री ११.२० वाजता बाली सामुद्रधुनी परिसरात दुर्दैवी घटना घडली. जावा येथून एका पर्यटनस्थळाच्या दिशेने निघालेली फेरीबोट उलटली.

फेरीबोटीत ५३ प्रवासी आणि १२ क्रू सदस्य होते. जावाच्या केतापांग बंदरावरून निघाल्यानंतर बालीच्या गिलिमानुक बंदराजवळ म्हणजे सुमारे ५० किमी. अंतर पार केल्यावर फेरीबोट उलटली. प्रवासाला सुरुवात केल्यानंतर जेमतेम अर्ध्या तासात दुर्दैवी घटना घडली. एकूण नऊ छोट्या बोटींमधून बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

आशिया खंडाच्या आग्नेय भागात इंडोनेशिया हा देश आहे. इंडोनेशिया हा १७ हजार लहान - मोठ्या बेटांचा समूह आहे. एका बेटावरुन दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी इंडोनेशियात फेरीबोटींचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. सुरक्षा मानकांचे पालन न केल्यामुळे इंडोनेशियात अनेक बोटींचे अपघात झाले आहेत. मार्च २०२५ मध्ये बालीच्या किनाऱ्याजवळ उसळलेल्या लाटांमुळे एक बोट उलटली होती. या दुर्दैवी घटनेत एका ऑस्ट्रेलियन महिलेचा मृत्यू झाला होता.
Comments
Add Comment