
मराठवाडा वार्तापत्र
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सर्वसाधारण ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेच २४ लाख ४५ हजार ९४९ हेक्टरवर म्हणजेच ४९.१९ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी मराठवाड्यातील जे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले, त्यामध्ये नांदेड जिल्ह्यासाठी ७ लाख ६१ हजार ५७६ हेक्टर, छत्रपती संभाजीनगरमधील ६ लाख ८१ हजार ९०३ हेक्टर, जालन्यातील ६ लाख ५१ हजार १७३ हेक्टर, बीडमधील ८ लाख ८ हजार ९४५ हेक्टर, लातूरमधील ५ लाख ८६ हजार १०१ हेक्टर, धाराशिवमधील ५ लाख ५४ हजार ३६० हेक्टर, परभणीतील ५ लाख ४ हजार ६८ हेक्टर, हिंगोलीतील ४ लाख १० हजार ३९८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
त्यापैकी २४ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये नांदेड जिल्ह्यात ४,८५,२८० हेक्टर, छत्रपती संभाजीनगरमधील ३,९४,९४९ हेक्टर, जालन्यातील १,९७,६६४ हेक्टर, बीडमधील १,९१,९०८ हेक्टर, लातूरमधील ४,३५,००१ हेक्टर, धाराशीवमधील ४,०६,०६६ हेक्टर, परभणीतील २,५५,७३७ हेक्टर व हिंगेालीमधील सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७९ हजार ३११, हेक्टर क्षेत्रावरील पेरणीचा समावेश आहे. मराठवाड्यात मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे पिके तरली आहेत. आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला, त्यामुळे कोवळ्या पिकाला देखील जीवदान मिळाले आहे.
‘दुबार’चे संकट टळले
मराठवाडा व विदर्भात पाऊस नसल्याने बळीराजा संकटात सापडला होता. मराठवाड्यात तर कडक उन्हाळा असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात दुबार पेरणीची भीती व्यक्त केली जात होती; परंतु अखेर निसर्गाने तारल्यामुळे नांदेड जिल्ह्यात २ दिवसांपूर्वी चांगलाच पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील ३९ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने दुबार पेरणीचे संकट तूर्त तरी टळले आहे. नांदेड जिल्ह्यातील ६ तालुक्यात चांगलाच पाऊस झाला. त्यामुळे बिलोली, कुंडलवाडी, हदगाव, नांदेड, भाकर, किनवट, माहूर या भागात शेतकऱ्यांंना आता दुबार पेरणी करण्याची गरज नाही. नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यात परिस्थिती अजूनही कठीणच आहे. अशीच परिस्थिती हिंगेाली व परभणी जिल्ह्यातही निर्माण झाली आहे. पाऊस नसला तर शेतकरी राजा परेशान होतो.
मराठवाड्यात तसेच विदर्भात पाऊस परतल्याने आनंदी-आनंद व्यक्त केला जात आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील दहेली मंडळात एकाच दिवसात १४७ मिलिलिटर पाऊस झाला. आणखी तीन दिवस मराठवाड्यात चांगला पाऊस राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विदर्भातील यवतमाळ, वाशिम तसेच बुलढाणा भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील या तीन जिल्ह्यांतील अनेक मार्ग ठप्प झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात तर वीज पडल्याने दोन भावंडांचा जागीच मृत्यू झाला.
मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे पुनरागमन झाले आहे. सर्वदूर मध्यम स्वरूपातील पाऊस सुरू असून आणखी दमदार पाऊस झाला तर उरलेल्या भागालाही दिलासा मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद, कन्नड, सिल्लोड, फुलंब्री, वैजापूर या भागातही चांगलाच पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, औंढा नागनाथ, जिंतूर या ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे या तीन भागातील दुबार पेरणी टळली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्याठिकाणी देखील आता दुबार पेरणी करण्याची गरज नाही. शेतकरी पाऊस नसल्यामुळे आकाशाकडे डोळे लावून बसला होता. अनेक ठिकाणी बियाणेच बोगस निघाल्यामुळे पेरणी करूनही पिकाची उगवण झाली नाही.
मराठवाड्यात मूग, ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर, उडीद आदी पिके प्रामुख्याने घेतली जातात. सध्याही यापैकी सोयाबीनचे पीक घेण्यावर शेतकऱ्यांंचा भर आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात मात्र पावसाने हात आखडता घेतला आहे. ८ दिवसांपासून त्या ठिकाणी पावसाचा खंड पडला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मे महिन्यात पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मशागत करायलाही पूर्व मोसमी पावसाने निट संधी दिली नाही.
मात्र शेतकऱ्यांनी त्यानंतर पेरणीयोग्य मशागत केली. बीड जिल्ह्यात या महिन्यात १ जूनपासून सरासरी ५० टक्के पाऊस पडला. बीड जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख ८ हजार हेक्टर आहेत. मात्र या तुलनेत साडेपाच लाखांच्या जवळपास पेरणी झाली. बीड जिल्ह्यात ६८ टक्के पेरणी उरकली आहे. नांदेड जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. खरीप हंगामासाठी ७ लाख ६१ हजार ५७६ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले. त्यापैकी ४ लाख ८५ हजार २८० हेक्टरवर पेरणी झाली आहे.
- अभयकुमार दांडगे