Thursday, July 3, 2025

अरे बापरे! पुण्यात हे चाललंय तरी काय? घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर बलात्कार!

अरे बापरे! पुण्यात हे चाललंय तरी काय? घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर बलात्कार!

पुणे: पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर तिच्याच घरात घुसून एका डिलिव्हरी बॉयकडून बलात्कार करण्यात आल्याचं उघड झालं आहे. या घटनेने पुणे शहर हादरलं असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे, या नराधमाने पीडित तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तिच्याच मोबाईलमधून 'सेल्फी' काढल्याची आणि 'परत येईल' असा संदेश टाईप करून ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. आरोपीने कोंढवा भागातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये 'डिलिव्हरी बॉय' असल्याचं सांगून प्रवेश मिळवला. त्यानंतर तो एका फ्लॅटमध्ये गेला आणि पीडित तरुणीला तुमचं कुरिअर आल्याचं सांगितलं. पीडितेने ते कुरिअर आपलं नसल्याचं स्पष्ट केलं तरी, आरोपीने तिला 'सही करावी लागेल' असं सांगून सेफ्टी डोअर उघडायला लावलं.



जसजसं पीडितेने सेफ्टी डोअर उघडलं, त्याच क्षणी आरोपीने तिच्या तोंडावर स्प्रे मारला आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या अमानुष कृत्यानंतर आरोपीने पीडितेच्याच मोबाईलने स्वतःसोबत सेल्फी काढले आणि 'परत येईल' असा मेसेज टाईप करून ठेवला.


घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तात्काळ रवाना केली आहेत. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment