Thursday, July 3, 2025

प्रदेशाध्यक्षपदी कोकणपुत्र भाजपायी...!

प्रदेशाध्यक्षपदी कोकणपुत्र भाजपायी...!

माझे कोकण : संतोष वायंगणकर


चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर भाजपाचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू होती. मंत्रिमंडळ विस्तारात रवींद्र चव्हाण यांना स्थान देण्यात न आल्याने त्यांच्याच नावाची शक्यता अधिक होती. अखेर भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू, माजी मंत्री आणि विद्यमान प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली अन् रवींद्र चव्हाण हे भाजपाचे १२वे प्रदेशाध्यक्ष ठरले...

महाराष्ट्र प्रदेश भाजपाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे कोकणचे सुपुत्र, माजी मंत्री आ. रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. निवड झाल्यानंतर, 'माझी आज या पदावर निवड झाली आहे. खरेतर भाजपाने मला हे पद देऊन माझ्यावर उपकार केले. माझी ओळख ही भारतीय जनता पार्टी आहे. मी २००२ साली पक्षाच्या कामाला सुरुवात केली. तिथून काम करत एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता, भाजपाचा अध्यक्ष होतो, हे कुठल्याच पक्षात होणार नाही. त्यामुळे हे माझ्यावर उपकार आहेत.


भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादाची विचारधारा तसेच मोदी सरकारचे लोकोपयोगी निर्णय राज्याच्या कानाकोपऱ्यांत जाऊन सामान्य माणसांपर्यंत नेऊन पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या साथीने पार पाडेन,' असे ते म्हणाले. तर भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने तळागाळातील हाडाचा कार्यकर्ता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झाला आहे. भाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी असून सामान्य कार्यकर्ता पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो, हे केवळ भाजपामध्येच शक्य आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे कौतुक केले.


भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण हे कोकणचे सुपुत्र आहेत. मात्र, त्यांचे कार्यक्षेत्र मुंबई-डोंबिवली आहे. आ. रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदावरची निवड जरी अपेक्षित मानली गेली तरीही आ. रवींद्र चव्हाण यांचे गेल्या काही वर्षांतील भारतीय जनता पक्षाचा ‘कार्यकर्ता’ म्हणून असलेलं कार्यच त्यांना प्रदेशाध्यक्षपदापर्यंत घेऊन गेले आहे. भारतीय जनता पक्षाच्या पक्षीय कार्यामध्ये आ. रवींद्र चव्हाण युवामोर्चापासून कार्यरत होते. पक्षीय स्तरावर प्रदेश भाजपाचे महामंत्री म्हणूनही त्यांनी यापूर्वी काम पाहिले आहे.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेत वाढलेल्या आ. रवींद्र चव्हाण यांनी नेहमीच पक्षाला अग्रस्थानी ठेऊन काम केले. भाजपा युवा मोर्चा, प्रदेश महामंत्री या पदांवर काम करताना आ. रवींद्र चव्हाण यांनी पक्षीय काम करताना भाजपा कसा वाढेल यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे साहजिकच कोकणातील एक व्यक्ती मुंबईत जाऊन स्थिरावतो. निव्वळ स्थिरावतोच असं नाही तर मुंबईतील डोंबिवली भागात डोंबिवलीकरांना सोबत घेत डोंबिवली-कल्याण महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केले.


पक्षीय कामामुळे डोंबिवलीतील नागरिकांशी संवाद होताच. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून विकासकामात सहभाग घेण्याची त्यांना संधी मिळाली. त्यानंतर आ. रवींद्र चव्हाण यांना डोंबिवलीचे आमदार होण्याची संधी मिळाली. महायुतीच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री म्हणून आ. रवींद्र चव्हाण यांना संधी दिली गेली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून संधी मिळाली तेव्हा त्यांनी कोकणसाठीही निधी उपलब्ध करून दिला. मागील सहा महिन्यांपूर्वीपासून आ. रवींद्र चव्हाण यांना नव्याने स्थापित झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष पदांवर आ. रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर महाराष्ट्राचे महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे कार्यरत असताना महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्याध्यक्ष पदाची सूत्र आ. रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली.


भाजपाच्या प्रदेशांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर निवड प्रक्रियेत प्रदेशाध्यक्षपदांसाठी आ. रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला त्याचवेळी गेली सहा महिने प्रदेशाध्यक्षपदावर आ. रवींद्र चव्हाण यांच्या निवडीच्या चर्चेला खऱ्याअर्थाने पूर्णविराम मिळाला. नेहमीच पक्षीय कामाची आवड असणाऱ्या आ. रवींद्र चव्हाण हे पक्ष वाढविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी स्वराज्यसंस्थांच्या निवडणुका दिवाळीदरम्यानच्या कालावधीत होण्याची शक्यता गृहीत धरूनच महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष स्वत:च्या पक्षाची रेषा मोठी करण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत.


महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गट, आरपीआय रामदास आठवले गट अशा चार मित्रपक्षांची मिळून महायुती आहे. तर राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पावर गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट या चार पक्षांची महाविकास आघाडी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती व महाविकास आघाडीचं राजकारण आहे. या महायुतीमध्ये राज्यात आपापल्या पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. महाविकास आघाडीत कोणाचा ताळमेळ कोणातच नाही अशीच काहीशी महाराष्ट्रात आणि कोकण भागात ही स्थिती आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी प्रयत्नशील आहे तशी स्वबळाची चर्चाही राज्यात सुरू झाली आहे.


अर्थात आजच्या घडीला कोकणाच्या राजकारणात महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वत:च्या अस्तित्वाच्या शोधात आहेत. मराठीच्या मुद्द्याआडून कोकणातील काही तालुका शहरामध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे सेनेने श्रेय घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातूनही महाविकास आघाडीला कोणताही राजकीय फायदा होणार नाही. कोकणातील राजकारण हे सध्या तरी महायुती भोवतीच फिरणारे आहे.


महाराष्ट्रात नजीकच्या काळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका अशा स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी एका कोकणच्या सुपुत्रावर सोपविण्यात आली आहे. फार भाष्य न करणे, मनातील कोणतेही मनसुबे चेहऱ्यावर उमटू न देता निर्विकार चेहऱ्याने त्यांचा असलेला सर्वत्रचा वावर, आ. रवींद्र चव्हाण यांच्या मनात नेमकं काय चाललंय याबद्दल चेहऱ्यावर पुसटशीही एक रेषाही उमटू न देता धीरगंभिरतेने राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव दिसतो.


शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी गट अशा दोन मित्र पक्षांना सोबत घेत प्रदेशाची राजकीय पक्षीय रणनिती आखण्याची मोठी जबाबदारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आ. रवींद्र चव्हाण यांच्यावर आहे. अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये असलेल्या कोअर कमिटी सर्व रणनिती निश्चित केल्यावर त्यावर शिक्कामोर्तब केला जातो असे म्हटले जाते. महायुतीतील सर्वच मित्रपक्ष पक्षीय वाढविण्यासाठी आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असताना शतप्रतिशत भाजपा हा भाजपाचा अजेंडा फार पूर्वीपासूनचा आहे.


कोकणात भाजपाबरोबरच एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही आपली ताकद वाढविण्याच्या कामाला लागली आहे. कोकणात सर्वच राजकीय पक्षांना अस्तित्व टिकवून ठेवणं आणि आपलं वर्चस्व नव्हे तर प्राबल्य दाखविण्याचा प्रयत्न सर्वांनाच करावयाचा आहे. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येतील तशीच त्याची अधिक गती वाढणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष पदावर कोकणच्या एका सुपुत्राची वर्णी लागली आहे. आ. रवींद्र चव्हाण मित्रपक्षांना सोबत घेत महाराष्ट्राच राजकारण कशा पद्धतीने करतात हे पाहणं फार औत्स्युक्याचं ठरेल.


Comments
Add Comment