मुंबई (प्रतिनिधी) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहायलातील (राणीची बाग) पेंग्विनच्या देखभालीसाठी मुंबई महापालिकेने गेल्या पाच वर्षांत २५ कोटी रुपये खर्च केल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. गेल्या सहा वर्षांत पेंग्विनची संख्या तब्बल २१ वर गेली आहे. त्यात ११ माद्या आणि १० नर आहेत.
सामाजिक कार्यकर्ते पिमेंटा गॉडफ्रे यांनी प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाकडे माहिती अधिकारांतर्गत काही प्रश्न विचारले होते. त्याला उत्तर देताना प्रशासनाने ही आकडेवारी दिली आहे. त्यानुसार २०२० ते २०२५ या कालावधीत करण्यात आलेल्या खर्चाची माहिती उत्तरादाखल देण्यात आली.
प्राणीसंग्रहालयातील स्वच्छतेसाठी २७ कोटी रुपये, उद्यानांच्या देखभालीसाठी ३१ कोटी रुपये व पेंग्विनच्या देखभालीसाठी २५ कोटी ८३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. राणीच्या बागेत २०१७मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आठ हंबोल्ट पेंग्विन आणण्यात आले.