Wednesday, July 2, 2025

हभप संगीताताई महाराजांची हत्या, दोन परप्रांतीय अटकेत

हभप संगीताताई महाराजांची हत्या, दोन परप्रांतीय अटकेत
छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथे महिला किर्तनकार हभप संगीताताई महाराजांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात दोन परप्रांतीयांना अटक केली आहे. आरोपी चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. आणि त्यांनी किर्तनकार महिलेची हत्या केली. ही माहिती प्राथमिक तपासातून हाती आली आहे. या प्रकरणी पुढील पोलीस तपास सुरू आहे.

मोहटादेवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी आश्रम परिसरात आले. त्यावेळी आश्रमाच्या गेटवरील कुलूप तोडले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. लगेच त्यांनी आश्रमात जाऊन पाहणी करण्याचा निर्णय घेतला. आश्रमात काय झालंय हे बघत असताना त्यांना संगीताताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी श्वान पथकाच्या मदतीने तपास केला.

किर्तनकार महिलेची हत्या कोणी आणि का केली असेल याचा अंदाज घेण्यासाठी पोलीस संगीताताईंच्या वडिलांना भेटले. संगीताताईंच्या वडिलांनी आश्रमाच्या जमिनीच्या वादाची माहिती पोलिसांना दिली. ही माहिती मिळल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान हत्येचे कारण जमिनीचा वाद नाही तर चोरी करण्याचा उद्देश असल्याची बाब समोर आली आहे.

चोरी करण्याच्या उद्देशाने दोन परप्रांतीय मजुरांनी आश्रमात घुसखोरी केली. पण चोरी करण्याआधी किंवा चोरी करतेवेळी संगीताताई पवार यांनी बघितले. यामुळेच संगीताताईंची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला

पोलिसांनी एकाला वैजापूरमधून आणि दुसऱ्या आरोपीला मध्य प्रदेशमधून अटक केली. पोलिसांनी चोरी झालेले देवीचे दागिने आणि दानपेटी जप्त केली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा