
महाराष्ट्र : दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) आज पुणे घाटमाथ्यावर वादळी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तळ कोकणासह किनारपट्टीच्या भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये पुढील सहा ते सात दिवस मान्सून सक्रिय राहणार असून, प्रचंड पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, पुढील चार ते पाच दिवस कोकण किनारपट्टी, मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
2 Jul,पुढील ४-५ दिवस कोकणात,मुंबई, ठाणेसह व मध्य महाराष्ट्रातील घाट भागात, भिन्न तीव्रतेसह मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भाच्या काही भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMDच्या अलर्ट पहा.@RMC_Mumbai @imdnagpur @SDMAMaharashtra pic.twitter.com/WEKM4apOyB
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 2, 2025
कोकण किनारपट्टीत गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. रायगड जिल्ह्याला आज (2 जुलै) आणि उद्या (3 जुलै) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भातही अनेक ठिकाणी दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. अकोला, अमरावतीसह वाशिममध्येही मुसळधार पाऊस नोंदवला गेला. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहेत.
पुढील ४ दिवसांसाठी हवामान अलर्ट:
२ जुलै: पुणे घाट परिसरात रेड अलर्ट. तळ कोकणासह किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (उदा. सातारा, कोल्हापूर, नाशिक घाट परिसर). मुंबई, पालघरमध्ये यलो अलर्ट. नाशिक, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट.
३ जुलै: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच पुणे, सातारा व कोल्हापूर घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुंबई, ठाणे, पालघर व नाशिक घाट परिसरात पावसाचा यलो अलर्ट.
४ जुलै: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच पुणे व सातारा घाट परिसरात यलो अलर्ट. कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट. विदर्भात गोंदिया व गडचिरोलीमध्ये यलो अलर्ट.
५ जुलै: रत्नागिरी, रायगड तसेच पुणे, सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर तसेच चंद्रपूरमध्ये ऑरेंज अलर्ट. सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, गोंदिया येथे यलो अलर्ट.
नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.