
विजय पवारवर "बॅड टच" आणि छळाचे आरोप
नवीन आरोपानुसार, विजय पवार हा आपल्या मुलीला केबिनमध्ये बोलावून 'बॅड टच' करायचा, असा दावा पीडितेच्या पालकांनी केला आहे. विजय पवार संचालक असलेल्या एका शाळेत दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एका विद्यार्थिनीला शाळेत झालेल्या वादामुळे त्रास दिला गेला होता. त्यावेळीही मुलीला शाळेबाहेर उभे करणे किंवा केबिनमध्ये बोलावून छेडछाड करणे असे प्रकार घडले होते. या पालकांनी गेल्या दोन वर्षांपासून यावर कारवाईसाठी पाठपुरावा केला होता, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नव्हती. आता पोलीस अधीक्षकांनी केलेल्या आवाहनानंतर हे पालक समोर आले असून त्यांनी आपली तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस अधीक्षक या तक्रारीची चौकशी करणार आहेत.
नेमके काय आहे प्रकरण?
बीडमधील नामांकित उमाकिरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासेसमध्ये जुलै २०२४ ते २५ मे २०२५ या कालावधीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची तक्रार २६ जून २०२५ रोजी शिवाजीनगर पोलिसांत दाखल झाली होती. याच दिवशी पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे दोघे फरार झाले होते. २८ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेने विजय पवारला लिंबागणेश परिसरातून, तर प्रशांत खाटोकरला चौसाळा बायपासवरून ताब्यात घेतले. २९ जून रोजी या दोघांनाही बीड जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
धनंजय मुंडेंनी केले गंभीर आरोप
या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले. गुन्हा दाखल झाला त्या दिवशी रात्री ११ वाजता संदीप क्षीरसागर आरोपींसोबत होते आणि आरोपींना त्यांचे पाठबळ आहे, असे मुंडे यांनी म्हटले. संदीप क्षीरसागर आणि आरोपींचे संबंध समोर यावेत यासाठी सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.