
मुंबई: अभिनेते आणि निर्माते आदेश बांदेकर यांनी 'माऊली महाराष्ट्राची' या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंढरपूर वारीमध्ये सहभाग घेतला आणि थकलेल्या वारकऱ्यांची सेवा केली. त्यांचा वारकऱ्यांचे पाय दाबून सेवा करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सेवेत त्यांच्यासोबत 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतील अभिनेते हृषिकेश आणि सारंग तसेच सुमीत पुसावळे आणि उदय नेने हे कलाकारही सहभागी झाले होते.
पंढरीची वारी अनुभवण्याची अनेकांची इच्छा असते, आणि हीच संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीने 'माऊली महाराष्ट्राची' हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमातून वारीचे विविध क्षण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. देहू-आळंदीहून किंवा राज्यातील इतर ठिकाणांहून चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेकजण पुढे येतात. यामध्ये थकलेल्या वारकऱ्यांचे पाय दाबून देणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे अशा विविध सेवांचा समावेश आहे. आदेश बांदेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या पायांना मलम लावून देत, त्यांचे पाय दाबून सेवा केली.
View this post on Instagram
स्टार प्रवाहने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यांच्या या कृतीचे कौतुक केले आहे. अनेक युजर्सनी हार्ट इमोजी पोस्ट करत आपले प्रेम व्यक्त केले. मात्र, काही इन्स्टाग्राम युजर्सनी ग्लोव्ह्ज घालून पाय दाबल्याबद्दल ट्रोलिंगही केले, ज्यामुळे हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
'माऊली महाराष्ट्राची' हा कार्यक्रम २३ जूनपासून दररोज संध्याकाळी ६ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होतो. या कार्यक्रमातून आळंदी-देहूपासून थेट पंढरपूरपर्यंतचा वारीचा प्रवास आणि महाराष्ट्राच्या या महान धार्मिक परंपरेचे दर्शन घडवले जात आहे. स्टार प्रवाहवरील अमित भानुशाली, आकाश नलावडे, अभिजीत आमकर, शर्वरी जोग यांसारख्या अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. लवकरच सुरू होणाऱ्या 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेतील समृद्धी केळकर आणि अभिजीत रहाळकर हे कलाकारही वारीमध्ये सहभागी झाले होते.