
वाडा : वाडा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सोनाळे या विद्यालयात एका पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गेल्या दि. २६ जून रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली असून शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप विद्यार्थिनीचे वडील प्रकाश झाटे यांनी केला असून सदर मृत्यृची चौकशी करण्याची मागणी केली आहे. वेदिका झाटे (वय ११) असे त्या दुदैवी मुलीचे नाव आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बिलघर या गावात प्रकाश झाटे हे कुटुंबासह राहत असून त्यांना प्रियांका व वेदिका या दोन मुली असून प्रियांका ही सातवीत तर वेदिका ही पाचवीत न्यू इंग्लिश स्कूल सोनाळे येथे शिक्षण घेत होते. त्यांची शाळा रोज सकाळी १०.५० ते सायंकाळी ४.५० वा या वेळेत भरते. त्या रोज सकाळी १०.३० वाजता घरातून पायी चालत जातात व सायं. ५.३० वाजेपर्यंत घरी परत येत असतात. दि.२६ जून रोजी सकाळी १०.३० वाजता या दोन्ही शाळेत गेल्या. साधारण सायंकाळी ४.१५ वाजण्याचे सुमारास न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे शिक्षक मोतीराम नडगे हे वेदिकास त्यांचे कारमधून घरी घेऊन आले, त्यावेळी वेदिका ही पूर्णपणे बेशुद्ध होती. याबाबत मोतीराम सरांना विचारले असता त्यांनी सांगितले की दुपारी ३.३० वाजता मधली सुट्टी झाली तेव्हा तुमची मुलगी वेदिका हीस अचानक चक्कर येऊन ती बेशुद्ध झाली, म्हणून मी तिला घरी घेऊन आलो आहे. तेव्हा मुलीच्या पालकांनी शाळेच्या जवळच दवाखाना आहे तुम्ही माझे मुलीला दवाखान्यात का नेली नाही असे विचारले. तेव्हा ते काही एक न बोलता निघून गेले त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वेदिकेला मोटारसायकलवरून वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात ४.४५ वाजता उपचारासाठी घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.
दरम्यान, वेदिका हिच्यावर वेळेत उपचार केला असता तर मुलीचे प्राण वाचले असते, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी उपचार करण्यात उशीर केल्याने मुलीचा जीव गेला असल्याचा आरोप प्रकाश झाटे यांनी करून शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या अकस्मात मृत्यूची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात शाळेचे मुख्याध्यापक वसंत महाले यांच्याशी संपर्क साधला असता वेदिका ही मधल्या सुट्टीत खेळत होती.
खेळता खेळता तिला चक्कर आली, त्यानंतर शिक्षकांनी तिला पाणी वगैरे देण्याचा प्रयत्न केला मात्र तिने पाणी प्याले नाही. वेदिकेने शिक्षकांना घरी घेऊन जाण्यास सांगितले त्यानंतर शिक्षकाने तिला घरी सोडले असल्याची माहिती दिली. येथून आरोग्य उपकेंद्र हे दीड किमी अंतरावर असल्याचेही महाले यांनी सांगितले. याबाबत अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास सुरू असल्याचे वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी म्हटले आहे.