
राज ठाकरे यांनी चित्रपटाविषयी आपले मत व्यक्त करताना सांगितले, “अमेय खोपकर या चित्रपटाचे तीन भाग घेऊन आले आहेत, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्वाची बाब आहे. हा एक मैलाचा दगड आहे. चित्रपटाचा ट्रेलर धमाल असून याला उत्तम कलाकारांची साथ लाभली आहे. ‘येरे येरे पैसा’ ब्लॅाकबस्टर होता आणि तीनही नक्कीच तसाच ब्लॅाकबस्टर ठरेल, याची खात्री आहे.’’
रोहित शेट्टी म्हणाले, “चित्रपटाचा ट्रेलर कमाल आहे. ‘येरे येरे पैसा ३’ हा पूर्णपणे बॉलिवूड लेव्हलचा एंटरटेनमेंट पॅकेज आहे. संजय जाधव आणि टीमचं काम जबरदस्त असून या चित्रपटाला माझ्याकडून खूप शुभेच्छा.’’
चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, '' चित्रीकरणाच्या सुरुवातीपासून माझी अशी इच्छा होती की, या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला रोहित शेट्टी आणि राज ठाकरे यावेत आणि माझी ही इच्छा पूर्ण झाली. 'येरे येरे पैसा’ला रोहित शेट्टी आले होते आणि तो सुपरहिट ठरला. त्यामुळे यावेळीही त्यांनी यावे, असे मनात होते. ‘येरे येरे पैसा ३’मध्ये आमची जबाबदारी तिपटीने वाढली होती. तिसरा भाग बनवताना आम्ही हेच लक्षात घेतलं आणि त्यामध्ये हसवणं, विचार करायला लावणं आणि गुंतवून ठेवणं, या सगळ्याच गोष्टी एकत्र गुंफल्या आहेत. मला खात्री आहे, तिसऱ्या भागावरही प्रेक्षक तितकेच प्रेम करतील.''
निर्माते अमेय विनोद खोपकर आणि निनाद बत्तीन म्हणतात, “येरे येरे पैसा' ही फक्त मालिका नाही, ही मराठी सिनेमाच्या कमर्शिअल यशाची ओळख आहे. यावेळी आम्ही या या यशाची उंची आणखी वाढवली आहे. मराठी प्रेक्षक आता केवळ कौटुंबिक कथा पाहात नाहीत, त्यांना वेगळा अनुभव हवा असतो आणि ‘येरे येरे पैसा ३’ हा एक अफलातून अनुभव देईल, याची खात्री आहे.''
धर्मा प्रॉडक्शन्सचे अपूर्व मेहता यांनी सांगितले, “मराठी सिनेमा आता खूप वेगाने बदलत आहे. ‘येरे येरे पैसा ३’ हा चित्रपट त्याचेच एक उदाहरण आहे आणि आम्हाला अशा दमदार मराठी चित्रपटाचा भाग होता आलं, हे भाग्य वाटतं.”
धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित आणि वर्डविझार्ड एंटरटेनमेंट सहनिर्मित या चित्रपटाचे सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे निर्माते असून सौरभ लालवाणी हे सहनिर्माते आहेत. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांसारख्या दमदार कलाकारांचा समावेश आहे.