Tuesday, July 1, 2025

Asim Munir: पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर पुन्हा बरळला!

Asim Munir: पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर पुन्हा बरळला!

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देण्याच्या केल्या वल्गना


इस्लामाबाद : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे दिलेल्या कडक प्रत्युत्तरानंतरही पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. पाकिस्तानचा लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर याने पुन्हा एकदा भारताला धमकी देत म्हटले आहे की, जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर त्याचे तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल.


कराची येथील पाकिस्तानी नौदल अकादमीच्या पासिंग आऊट परेडमध्ये उपस्थित असताना मुनीर याने हे धमकीचे वक्तव्य केले. तसेच पाकिस्तान काश्मिरी लोकांच्या पाठीशी कायम राहील आणि भारताच्या कोणत्याही आक्रमणाला तोंड देण्यास तयार आहे, अशा वल्गनाही त्याने केल्या.


असीम मुनीर याने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना खुलेआम समर्थन देत विवादास्पद विधान केले. त्याने म्हटले की भारत ज्याला दहशतवाद संबोधतो, तो प्रत्यक्षात एक न्याय्य संघर्ष आहे. पाकिस्तान काश्मिरी जनतेला राजकीय, राजनैतिक आणि नैतिक समर्थन देत राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.



नौदल अकादमीच्या समारंभात बोलताना मुनीर याने आरोप केला की भारताने पाकिस्तानवर दोनदा अकारण हल्ले केले आहेत. त्याने चेतावणी दिली की भविष्यातील कोणत्याही आक्रमणाची संपूर्ण जबाबदारी आक्रमणकर्त्यावर असेल.


"भारत ज्याला दहशतवाद म्हणतो तो वास्तवात एक वैध लढा आहे. पाकिस्तान नेहमीच काश्मीरच्या बाजूने उभा राहील," असे मुनीर याने स्पष्ट शब्दात म्हटले. तो यावरच थांबला नाही तर पुढे म्हणाला, "जर भारताने पुढे कधी हल्ला केला तर पाकिस्तानही योग्य ते उत्तर देईल. आम्ही हे आधीच दाखवून दिले आहे - २०१९ मध्ये बालाकोटच्या हवाई हल्ल्याला आम्ही उत्तर दिले आणि आताही ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर दिले."


या वक्तव्यादरम्यान मुनीर याने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांना पाठिंबा देत भारत आणि काश्मीरच्या संदर्भात अनेक भडकावू टिप्पण्या केल्या. असीम मुनीर याच्याकडून भारताला धमकी देण्याचा हा पहिला प्रसंग नसून त्याने पूर्वीही अनेकवेळा भारतविरोधी वक्तव्ये केली आहेत.


यापूर्वी पहलगाम हल्ल्याच्या एक आठवडा आधी १६ एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये परदेशी पाकिस्तानी नागरिकांच्या एका कार्यक्रमात मुनीर याने वादग्रस्त भाषण केले होते. त्यावेळी त्याने काश्मीरचे वर्णन पाकिस्तानच्या 'गळ्याची नस' म्हणून केले होते.


दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले होते. या ऑपरेशनमध्ये शंभराहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या काळात पाकिस्तानी सैन्याने अनेक भारतीय शहरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीय सैन्याने त्यांना मोठा धक्का दिला.


पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला.पण आता पुन्हा एकदा पाकिस्तानच्या नेत्यांना वल्गना करण्याची खूमखूमी आल्याचे यावरुन दिसून येते.

Comments
Add Comment