Tuesday, July 1, 2025

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: "बाप तो बाप होता है" एकनाथ शिंदे यांनी लगावला नाना पटोले यांना टोला 

Maharashtra Assembly Monsoon Session 2025:

मुंबई: भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे नेते नाना पटोले आक्रमक झाले. त्यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं. यादरम्यान, पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला, ज्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना सणसणीत टोला लगावला आहे.  मोदींवर टीका करून चर्चेत राहता येतं, त्यामुळे 'बाप तो बाप होता है' असे एकनाथ शिंदें यांनी प्रतिक्रिया दिली.


महाराष्ट्र विधानसभेत आज झालेल्या पावसाळी अधिवेशनाचा दूसरा दिवस शेतकऱ्यांच्या विषयांवरून चांगलाच गाजला. लोणीकर यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करत विरोधी पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माफी मागण्याची मागणी केली.  दरम्यान, नाना पटोले अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी ओरडून सांगितले की, "शेतकऱ्यांचा बाप पंतप्रधान मोदी नसतील; ते तुमचा बाप असतील." त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. सभाध्यक्षांच्या समोरील राजदंडाला त्यांनी स्पर्श करत, घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे अध्यक्षांकडून नाना पटोले यांना दिवसभरासाठी विधानसभेतून निलंबित केले गेले. तर विरोधकांनी सभात्याग केला.



काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे?


पावसाळी अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या गोंधळाबद्दल आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे. नाना पटोले यांच्या निळंबनाविषयी बोलताना त्यांनी त्यांच्या वर्तणूकीचा खरपूस समाचार घेतला. एकनाथ शिंदे म्हणाले की, "नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना सभागृहाचे नियम माहित आहे. पण ते असे का वागले याची माहिती नाही. त्यांनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न पण केला. त्यांच्याकडून अशा कृतीची अपेक्षा नव्हती. गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले हे चर्चेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे दिल्लीतील लोकांना दाखवण्यासाठी, चर्चेत राहण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं असावं. त्यांचे नेते राहुल गांधी हे परदेशात जाऊन मोदींवर टीका करतात. तसंच नाना पटोले यांनी केलं. पण बाप तो बाप होता है."  तर अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं योग्य नाही, नाना पटोलेंनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली.



आम्हाला निलंबित करायचं असेल तर करा- नाना पटोले


शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्यांचा सन्मान आणि शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणाऱ्याचे निलंबन अशी भूमिका राज्य सरकार घेत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. ते म्हणाले की, "आज शेतकऱ्यांचा दिवस आहे, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आज मी शुभेच्छा देतो. महायुतीचं सरकार आहे, त्यांची वास्तविकता आज समोर आली. कृषिमंत्री, आमदार हे शेतकऱ्यांना भिकारी समजतात. शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. बोनस देत नाहीत. कर्जमाफी करण्याची भूमिका मांडली होती, पीकविमा बंद केला. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही. बबनराव लोणीकर यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. रोज हा विषय मांडू, आम्हाला निलंबित करायचं असेल तर करा."

Comments
Add Comment