
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
इंदिरा गांधींनी २५ जून १९७५ ते मार्च १९७७ या काळात देशावर लादलेल्या आणीबाणीत तब्बल एकवीस महिने विरोधी पक्षांचे दिग्गज नेते व लक्षावधी प्रमुख कार्यकर्ते जेलमध्ये होते. याच काळात इंदिरा गांधींना सत्तेवरून हटविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका लढवल्या पाहिजेत यावर सर्व नेत्यांमध्ये मतैक्य झाले. वेगवेगळ्या विचारसरणीचे आणि वेगवेगळा अजेंडा असणारे राजकीय पक्ष आणीबाणी उठल्यानंतर काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी एकत्र आले. काँग्रेसचा पराभव करणे हे एकमेव उद्दिष्ट विरोधी पक्षांकडे होते. त्यातूनच लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या आशीर्वादातून जनता पार्टीचा उदय झाला. आणीबाणीनंतर झालेल्या १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि केंद्रात जनता पार्टीचे सरकार स्थापन झाले. मोरारजी देसाई यांनी बिगर काँग्रेसचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, पण चार मोठे राजकीय पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेल्या जनता पार्टीचे सरकार फार काळ टिकले नाही. सतत हेवे-दावे, आरोप-प्रत्यारोप, समाजवादी विरुद्ध जनसंघ अशा संघर्षानेच जनता पार्टीचा घात केला. जनसंघाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध ठेवायचे नाहीत, यासाठी समाजवादी हट्टाला पेटली होती, तर आमची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आम्ही कदापि दूर करू शकत नाही, अशी ठाम भूमिका जनसंघाची होती. याच वादातून जनता पार्टीला मोठे तडे गेले.
जनता पार्टी सरकारला केंद्रात पाच वर्षांची टर्मही पूर्ण करता आली नाही आणि १९८० मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा सत्ताही मिळवता आली नाही. काँग्रेसला पर्याय म्हणून निर्माण झालेल्या जनता पार्टीचे व नंतर जनता दलाचे पुढे अनेक तुकडे पडले. स्वातंत्र्यानंतर वर्षानुवर्षे केंद्रात व विविध राज्यांत काँग्रेसची सत्ता होती. आणीबाणीपूर्वीही काँग्रेसच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा प्रयोग केला होता. ओल्ड काँग्रेस (काँग्रेसमधील फुटीर गट), भारतीय जनसंघ, स्वतंत्र पार्टी, समाजवादी पार्टी यांनी १९७१ मध्येही काँग्रेसच्या विरोधात एकत्र येण्याचा प्रयत्न केला होता. पण काँग्रेसच वरचढ ठरली. उत्तर प्रदेशात १९७४ च्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या विरोधात संयुक्त आघाडी करून निवडणूक लढवली. पण काँग्रेसचे एच. एन. बहुगुणांनी पुन्हा सत्ता प्राप्त केली. मात्र गुजरातमध्ये विविध विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनमोर्चा स्थापन केला व १९७५च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करून दाखवला. त्यावेळी गुजरातमध्ये विद्यार्थ्यांचे नवनिर्माण आंदोलन तीव्र होते. या आंदोलनाचा लाभ जनमोर्चाला मिळाला. गुजरातमध्ये विरोधी पक्षाला मिळालेल्या यशानंतर बिहारमध्ये हाच प्रयोग केला गेला. आणीबाणीनंतर गुजरातमधील जनमोर्चाच्या मॉडेलचा आधार आणि जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वातून प्रेरणा घेऊनच जनता पार्टीचा उदय झाला. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वावर जनतेचा मोठा विश्वास होताच, पण त्यांच्यातील नैतिक सामर्थ्यानेच जनता पार्टीला मोठा जनाधार प्राप्त झाला. दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींवर सत्तेचा गैरवापर करून निवडणूक लढविल्याचा ठपका ठेवला, त्यांना दोषी ठरवले व त्यांची खासदार म्हणून झालेली निवड रद्द केली. या निकालानंतर इंदिराजी आता काय डावपेच लढवणार याची विरोधी पक्षाला मोठी उत्सुकता होती. न्यायालयाच्या निकालानंतर भारतीय लोकदल, भारतीय जनसंघ, ओल्ड काँग्रेस व समाजवादी पार्टीच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एकच मोठा पक्ष स्थापन करावा असे चरणसिंग यांना वाटत होते, तर जनसंघाच्या नेत्यांना पक्षांचे विलीनीकरण मान्य नव्हते. गुजरात मॉडेल जनमोर्चा प्रमाणेच राष्ट्रीय पातळीवर आघाडी स्थापन करावी अशी भूमिका मोरारजी देसाई यांनी मांडली. समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी मात्र राजकीय पक्षांचे विलीनीकरण झाले तरी वेगवेगळ्या विचारधारांचे विलीनीकरण कसे होणार, असा प्रश्न उपस्थित केला. भारतीय लोकदल, जनसंघ, ओल्ड काँग्रेस, स्वतंत्र पार्टी, संयुक्त सोशलिस्ट पार्टी, उत्कल काँग्रेस या पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टीची स्थापना केली. शेतकरी नेते चरणसिंग यांनी ऑगस्ट १९७४ मध्ये त्यांचा पक्ष भारतीय क्रांती दल, स्वतंत्र पार्टी, संयुक्त सोशलिस्ट पार्टी व उत्कल काँग्रेस या चार पक्षांच्या विलीनीकरणानंतर भारतीय लोकदलाची स्थापना केली.
स्वतंत्र पक्षाची स्थापना सी. राजगोपालचारी यांनी केली होती. संयुक्त सोशलिस्ट पार्टीचे नेते म्हणून राम मनोहर लोहिया ओळखले जायचे. उत्कल काँग्रेसचे नेते बिजू पटनाईक होते. काँग्रेस पक्षात १९६९ मध्ये फूट पडल्यावर काँग्रेस ओल्ड व काँग्रेस आर असे दोन गट झाले. काँग्रेस आरचे नेतृत्व जरी जगजीवन राम यांच्याकडे असले तरी त्या पक्षावर संपूर्ण नियंत्रण इंदिरा गांधींचे होते. काँग्रेस ओल्डचे नेतृत्व एस. निजलिंगप्पा यांच्याकडे होते. काँग्रेस ओल्डमध्ये जुने व स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतलेले नेते होते. पंडित नेहरूंनंतर मोराराजी देसाई पंतप्रधान होतील असे सर्वांना वाटले होते, पण इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्याने मोरारजी होऊ शकले नाहीत. पुढे इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये उपपंतप्रधान म्हणून काम करावे लागले. भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ मध्ये झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय आघाडी म्हणून जनसंघाची ओळख होती. ज्यावेळी जनसंघ जनता पार्टीत विलिन झाली तेव्हा लालकृष्ण अडवाणी हे पक्षाचे प्रमुख होते. जनसंघाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आहे म्हणून समाजवाद्यांचा मोठा आक्षेप होता. सोशलिस्ट पार्टीचे नेतृत्व जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे होते. सोशलिस्ट पक्षात अनेक वेळा फूट पडली. १९७७ मध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेस फॉर डेमॉक्रसी हा काँग्रेसमधील फुटिरांनी स्थापन केला. आणीबाणीचा फटका काँग्रेसमधील काही बड्या नेत्यांनाही बसला. या काळात एच. एन. बहुगुणा (उत्तर प्रदेश), नंदिनी सत्पथी (ओडिसा) यांना पक्षाने मुख्यमंत्रीपदावरून हटवले. त्यांनीच काँग्रेस फॉर डेमॉक्रसीची स्थापना केली व तो गट जनता पार्टीत सामील झाला. तेव्हा जनता पार्टीचे नेतृत्व ८१ वर्षांच्या मोरारजी देसाईंकडे होते. जनता पार्टीने १९७७ ची लोकसभा निवडणूक लढवली पण निवडणूक आयोगाकडे नोंदणीचे उपचार पूर्ण न झाल्यामुळे जनता पार्टीला भारतीय लोकदलाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी लागली. तसेच जनता पार्टीने तामिळनाडूत ओल्ड काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली. जनता पार्टीने लोकसभेच्या ५४२ पैकी २९८ जागा जिंकल्या. भारतीय जनसंघाचे सर्वाधिक म्हणजे ९३ मतदारसंघांत खासदार निवडून आले. भारतीय लोकदलाचे ७१, ओल्ड काँग्रेसचे ५१, सोशलिस्ट पार्टीचे २८, काँग्रेस फॉर डेमॉक्रसीचे २८ खासदार निवडून आले. २४ मार्च १९७७ रोजी मोरारजी देसाई यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. जनता पार्टीच्या सरकारमध्ये चरणसिंग हे केंद्रीय गृहमंत्री होते. पंतप्रधानपद मिळाले नाही म्हणून ते नाराज होते. त्यातून सत्ताधारी पक्षात ताणतणाव वाढत गेला. १ जुलै १९७८ रोजी मोरारजी देसाई यांनी चरणसिंग यांना सरकारमधून हटवले. पण एक महिन्यानंतर चरणसिंग हे उपपंतप्रधान म्हणून परतले. तरीही चरणसिंग हे समाधानी नव्हते. १६ जुलै १९७९ रोजी राजीनामा देऊन सरकारमधून ते बाहेर पडले आणि जनता दल सेक्युलर नावाचा नवीन पक्ष स्थापन केला. पुढे काही दिवसांतच काँग्रेस पक्षाचा पाठिंबा घेऊन ते पंतप्रधान झाले. त्यांचे सरकार महिनाभरही टिकले नाही, विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याअगोदरच त्यांनी राजीनामा दिला. जनता पार्टीचे सरकार स्थापन होऊन वर्षही झाले नसताना समाजवादी नेते मधू लिमये यांनी जनसंघावर दुहेरी सदस्याचा आरोप करून त्याला आक्षेप घेतला.
दि. २ सप्टेंबर १९७९ रोजी जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली. त्यात दुहेरी सदस्यत्वावर चर्चा झाली. निवडून आलेल्या आमदार-खासदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात भाग घेण्यास मनाई करावी, असे चंद्रशेखर यांनी संघाच्या नेत्यांना सुचवले. दि. १९ मार्च १९८० रोजी जनता पार्टीच्या संसदीय मंडळाची बैठक झाली व पदाधिकाऱ्यांनी संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ नये, असा निर्णय घेतला. केवळ पंधरा दिवसांनंतरच, दि. ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनसंघाने पक्षाचे अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाची घोषणा केली.
आपलाच पक्ष खरी जनता पार्टी आहे, असा दावाही जनसंघाने निवडणूक आयोगाकडे केला. पुरावा म्हणून आपल्या पक्षाच्या खासदारांच्या नावाची यादी जोडली.
दि. २४ एप्रिल रोजी या पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली व पुढे भारतीय जनता पक्ष उदयाला आला. मार्च १९८० मध्ये जनता पार्टी (एस)चे चरणसिंग यांनी आपल्या पक्षाचे नामकरण लोकदल करावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली, पण इंदिरा गांधींचा निवडणुकीत पराभव करणारे दिग्गज नेते राज नारायण यांनी त्याला आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाने जनता पार्टी एस (चरणसिंग) व जनता पार्टी एस (राजनारायण) असा तोडगा दिला. कालांतराने चरणसिंग यांनी आपल्या पक्षाचे नामकरण लोकदल केले. जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी दि. २९ एप्रिल १९८० रोजी पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, पण दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगाने त्यांच्या मागणीला होकार दर्शवला. १९८० मध्ये जनता पार्टी सेक्युलर पक्ष लोकदलात विलिन झाला. नंतर लोकदल हा जनता दलात विलिन झाला. १९८९-९१ या काळात जनता दलाचे केंद्रात सरकार राहिले. नंतर जनता पार्टीप्रमाणेच जनता दलाचे तुकडे पडले. सोशलिस्ट समता पार्टी, समाजवादी जनता पार्टी (राष्ट्रीय), राष्ट्रीय जनता दल, बिजू जनता दल, राष्ट्रीय लोकदल, जनता दल युनायटेड, जनता दल सेक्युलर असे अनेक तुकडे पडले.
[email protected]
[email protected]