Thursday, August 28, 2025

आयएनएस तमाल भारतीय नौदलात

आयएनएस तमाल भारतीय नौदलात
मॉस्को : आयएनएस तमाल ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. रडारपासून स्वतःचे अस्तित्व लपविणारी ही रशियात तयार केलेली स्टेल्थ फ्रिगेट आहे. देशाबाहेर बांधलेली ही भारताची शेवटची युद्धनौका आहे. यापुढे भारतीय युद्धनौकांची निर्मिती देशातच करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडचे ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ व्हाईस अॅडमिरल (नौदलाचे उपप्रमुख) संजय जे सिंग यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. या सोहळ्यात अनेक उच्चपदस्थ भारतीय आणि रशियन सरकारी आणि संरक्षण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तामल हे दुसरे तुशील वर्गातील जहाज आहे, ते तलवार आणि तेग वर्गातील जहाजांचे (क्रिवाक वर्ग, प्रकल्प ११३५.६) अपग्रेड केलेले आवृत्ती आहे. तलवार आणि तेग वर्गातील पहिली सहा जहाजं २००३ ते २०१३ पर्यंत भारतीय नौदलात दाखल झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत तुशील श्रेणीतील पहिले जहाज आयएनएस तुशील ९ डिसेंबर २०२४ रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. आतापर्यंत नौदलाच्या सेवेत दाखल झालेली तुशील श्रेणीतील सात जहाजं पश्चिम नौदल कमांड अंतर्गत भारतीय नौदलाच्या पश्चिम ताफ्याचा भाग आहेत. या सात जहाजांचे एकत्रितरित्या 'द स्वॉर्ड आर्म' असे वर्णन केले जाते. रशियासोबतच्या आंतर-सरकारी करारात तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये 'त्रिपुट आणि तवास्य' नावाच्या दोन फ्रिगेट्सची बांधणीही करण्यात आली. युनायटेड शिपबिल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ रशियाने तेग, तलवार आणि तुशील श्रेणीतील जहाजांची बांधणी केली. जगातील कोणत्याही शिपयार्डने एवढ्या मोठ्या संख्येने दुसऱ्या देशासाठी जहाज बांधणी करण्याची ही एक दुर्मिळ घटना आहे. 'आयएनएस तमाल'ची वैशिष्ट्ये 'आयएनएस तमाल'मध्ये तीस टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामुग्री आहे. ही फ्रिगेट समुद्र आणि जमिनीवर लक्ष्य करण्यासाठी ब्राह्मोस लांब पल्ल्याच्या क्रुझ क्षेपणास्त्रांचा प्रभावी वापर करण्यास सक्षम आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, सुधारित A190 100 MM तोफा,30 MM CIWS, आधुनिक EO/IR सँडल V प्रणाली, हेवीवेट टॉर्पेडो, त्वरित हल्ला करणारी अँटी-सबमरीन रॉकेट्स आणि आधुनिक रडार, अग्नि नियंत्रण यंत्रणा, कामोव ३१ एअर अर्ली वॉर्निंग, कामोव २८ मल्टी रोल हेलिकॉप्टर, SATCOM, रेडिओ, हाय-स्पीड डेटा लिंक आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटसह नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर क्षमतांनी ही फ्रिगेट सुसज्ज आहे. ताशी ३० सागरी मैल वेगाने प्रवास करत हल्ला आणि प्रतिहल्ला करण्याची क्षमता या फ्रिगेटमध्ये आहे. कॅप्टन श्रीधर टाटा आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम जिल्ह्यातील श्रीधर टाटा हे आयएनएस तमाल या फ्रिगेटचे पहिले कॅप्टन आहेत. ते फ्रिगेटवर २५० नौसैनिकांचे नेतृत्व करणार आहेत. कॅप्टन श्रीधर टाटा यांचे वडील आणि सासरे या दोघांनी भारतीय वायुदलात ३० - ३० वर्षे काम केले होते. त्यांचा भाऊ आणि मेव्हणा हे दोघे लष्करात वरिष्ठ अधिकारी आहेत. कॅप्टन श्रीधर टाटा विजयनगरम येथील कोरुकोंडा सैनिक शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या अनेकांनी सैन्यात महत्त्वाची पदे भूषवली आहेत. लेफ्टनंट जनरल के. सुरेंद्र नाथ, व्हाईस अॅडमिरल एम.एस. पवार आणि गलवान संघर्षात हुतात्मा झालेले कर्नल बी. संतोष बाबू हे याच शाळेचे विद्यार्थी आहेत. कॅप्टन श्रीधर टाटा २६ वर्षांपासून भारतीय नौदलात आहेत. त्यांनी १२ युद्धनौकांवर काम केले आहे. भारतीय नौदलाच्या तीन युद्धनौकांचे नेतृत्व करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. ऑपरेशन पराक्रम आणि सागरी चाच्यांविरुद्धची कारवाई यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताच्या सागरी सुरक्षा विभागाच्या सचिवालयात त्यांनी संस्थापक सदस्य म्हणून काम केले आहे.
Comments
Add Comment