
मंगळवारी सकाळी 11 वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. कामकाजाच्या सुरुवातीला प्रश्न-उत्तराचे सदर झाले. ज्यामध्ये अनेक विषयावर चर्चा करण्यात आले. ज्यात इंद्रयणी नदीवरील जीर्ण पूल अपघाताचा मुद्दा देखील उचलून धरला गेला. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी या सदरात कुंडमळा पूल अपघातासारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकार अशा पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल प्रश्न विचारला.
काय म्हणाले चेतन तुपे?
चेतन तुपे यांनी कुंडमळा दुर्घटनेसंबंधीत, शासन कोणती कारवाई करणार याबद्दल प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "अशा पुलांवर पर्यटकांची गर्दी जर झाली तर ते ढासळण्याची भीती सर्वाधिक आहे. त्यामुळे यानंतरही असे कमकुवत पूल आढळले, तर काय कारवाई करणार? आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेविषयी ही सभागृहात प्रश्न उपस्थित केला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उत्तर
चेतन तुपे यांनी मांडलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी म्हंटले, "पूल धोकादायक असल्याचा फलक लावून देखील, पर्यटक मोठ्या संख्येने तिथे जमले. याठिकाणी जास्त पर्यटक आल्यामुळे पुल कोसळला, त्यात चार लोकांचा मृत्यू झाला. ही बाब गंभीर आहे. राज्यात असे अनेक धोकादायक पूल आणि पर्यटन स्थळ आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत १६ हजार ३९५ पुल राज्यात आहेत. पावसाळ्याआधी या सर्व पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यानुसार राज्यात चार पुल अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये आहेत. तसेच आठ पुलांचे अजूनही स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल हाती यायचे बाकी आहेत. पण या चार व आठ अशा बारा पुलांची डागडुजी व बांधणी करण्याबाबत कार्यवाई करू." असे आश्वासन त्यांनी दिले.
त्याचप्रमाणे, अशी घटना पुढे पुन्हा कधीच घडणार नाही यासाठी योग्य ती अंमलबजावणी आणि खबरदारी घेत असल्याचे ते पुढे म्हणाले. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, "इंद्रायणी नदीवर अपघातग्रस्त पूल नव्याने बांधण्याचे नियोजन केले जाईल, असे पुल ज्याठिकाणी असतील, तिथे ते वापरू नयेत म्हणून फलक लावून पूर्णपणे बंद केले जातील. त्यासाठी स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली जाईल."