लिहित्या हातांना बळ देणाऱ्यांचा सन्मान!

  36

डॉ. संजय कळमकर


संशोधन, बालसाहित्य निर्मिती आणि अध्यापन या तीनही क्षेत्रांमध्ये लीलया संचार करताना इतरांना लिहिते करणाऱ्यांपैकी एक म्हणजे डॉ. सुरेश सावंत. त्यांच्या ‘आभाळमाया’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांनी घडवलेल्या अनेक नवोदितांना स्वतःचाच सन्मान झाल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे. प्रदीप कोकरे यांच्या कादंबरीलाही साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणे कौतुकास्पद आहे.


मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जाहीर झालेल्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारावर डॉ. सुरेश सावंत आणि प्रदीप कोकरे यांनी आपली मोहर उमटवली. कोकरे हे युवा वर्गाचे प्रतिनिधी. कोल्हापुरात राहून ते संशोधन करतात. मुंबईतील संघर्षमय जीवनाचे संवेदनशीलतेने केलेले वर्णन म्हणजे त्यांची ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ ही कादंबरी. त्यांना यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक केंद्राची शरद पवार संशोधन फेलोशिप मिळालेली. ना. धों. महानोर पुरस्काराचे ते मानकरी. साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन त्यांचा जसा सन्मान केला, तसाच डॉ. सुरेश सावंत यांचाही केला. कोकरे मुंबईतील वडाळ्यात राहणारे तर डॉ. सावंत नांदेडचे. एक शहरी तर दुसरा ग्रामीण. एकाचा साहित्यप्रकार कादंबरीचा तर दुसरा मुलांसाठी लिहिणारा. त्यातही डॉ. सावंत यांची आवर्जून दखल घेतली पाहिजे. डॉ. सावंत यांनी लिहित्या हातांना बळ दिले. नवोदित लेखक, कवींना लिहिण्यासाठी मदत, मार्गदर्शन करून प्रेरित केले. त्यांनी जवळपास शंभरपेक्षा जास्त नवोदित लेखकांच्या पुस्तकांना प्रस्तावना देऊन नवोदित लेखकांच्या लिखाणाची पाठराखण केली. नवोदितांना पुस्तक प्रकाशनासाठी मुद्रणदोष तपासण्यापासून संपादन करण्यापर्यंत त्यांनी हातभार लावला. स्वतः अखंड लिहीत राहताना त्यांनी नवोदित लेखकांना उभे केले. त्यांना ‘लेखक घडवणारा लेखक’ म्हणतात. डॉ. सुरेश सावंत यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ, मराठवाडा साहित्य परिषद, मराठवाडा मुख्याध्यापक संघ, आविष्कार साहित्य मंडळ, शंकरराव चव्हाण व्याख्यानमाला इत्यादी संस्थांच्या माध्यमातून शिक्षण, संपादन, लेखन, समाजप्रबोधन या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. एक समृद्ध व्यक्तिमत्त्व, स्वतंत्र विचाराचे चिंतक, ग्रंथ चळवळीचे आधारस्तंभ, लेखक आणि सकारात्मक कार्याचा खजिना जनहितासाठी खुला करणारे द्रष्टे म्हणून त्यांची ओळख आहे. विविध संस्थांच्या बालसाहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. दशकातील उत्कृष्ट बालसाहित्यिक म्हणूनही त्यांचा गौरव झाला. जागतिक शांततेचा पुरस्कार करणारा ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ हा त्यांचा कवितासंग्रह चर्चेत आहे. डॉ. सावंत यांनी बालसाहित्यात दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. एरवी बालसाहित्य म्हणजे लहान मुलांनी लिहिलेले साहित्य की मोठ्या जाणकारांनी, प्रथितयश लेखकांनी मुलांच्या अंतरंगात प्रवेश करून मुलांसाठी लिहिलेले साहित्य अशा चर्चाही बऱ्याच रंगतात. या पार्श्वभूमीवर डॉ. सावंत यांनी आपली पूर्ण हयात बालसाहित्य लेखनात घालवली आहे. मुळात सावंत हे एक कृतिशील लेखक. त्या धारणेतून उतरलेले त्यांचे लेखन वास्तवदर्शी तसेच मुलांच्या भावविश्वात समरस होऊन केलेले आहे. अलीकडे मुले वाचत नाहीत, फक्त मोबाईलवरच असतात. कोणाचेही ऐकत नाहीत असे बोलले जाते; परंतु शिक्षक सजग असेल, त्याच्या मनात मुलांविषयी कळकळ आणि तळमळ असेल, तर मग अशा कलाकृती जन्माला येतात. मुलांच्या आवडीनुसार त्यांच्या भावविश्वाला कवेत घेणारी कलाकृती मुलं वाचतात, लिहायला प्रवृत्त होतात, हे यातून सिद्ध होते. मुलांच्या आनंदाची बाग फुलवण्याचे कसब अंगी असले की हे सहज शक्य होते. डॉ. सावंत यांनी बालसाहित्य नुसते लिहिले नाही, तर ते साहित्य मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आणि यशस्वी करून दाखवले. त्यांची पुस्तके मुलांना आनंद देणारी आहे. लहान मुलांसाठी लिहिताना लिहिणाऱ्या हातांना लहान व्हावे लागते. ती खरी कसोटी असते. त्यांनी लिहिलेल्या बालकवितांच्या संग्रहांवर मुलांनी भाष्य केले, याचाच अर्थ मुलांना त्यांनी लिहिलेले आवडले होते.


दुसरे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक प्रदीप कोकरे यांची कामगिरीही स्पृहणीय आहे. कुठल्याही सतावणाऱ्या विषयावर लिहिताना लेखकाला आतून खूप त्रास होत असला, तरी तो मांडताना त्याला एक जोखीम घ्यावीच लागते. अनेकदा त्याची घुसमटही होते; पण ती पार पाडण्यासाठी या दाहकतेतून पुढे जावेच लागते. जाणवणारी दाहकता मांडून पुढे न गेल्यास आधीचे सगळे प्रश्न लेखकाला सतावत राहणारच. त्यामुळे मनात साचलेले मांडून मी मोकळा होत राहिलो, अशी भावना त्यांनी पुरस्काराविषयी मांडली. ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ ही कादंबरी आधुनिक तरुण पिढीच्या भावविश्वाचे आणि जीवनातील संघर्षांचे प्रामाणिक आणि मार्मिक चित्रण करते.


मुंबईच्या चाळीतील जीवन, बदलते सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ आणि तरुण मनातील भावनिक हुंदके यांचे प्रभावी चित्रण या कादंबरीत आहे. कादंबरीतील नायकाच्या वर वर निरर्थक वाटणाऱ्या कृती हळूहळू चिंतनशील आणि अस्तित्वाच्या शोधाकडे वळतात. त्यामुळे ही कादंबरी नव्या पिढीचा सशक्त आवाज मानली जाते. कोकरे यांचे लेखन ग्रामीण आणि शहरी जीवनातील बारकावे तसेच आधुनिक तरुणांच्या भावनांचे गहन चित्रण करते. त्यांची साधी पण प्रभावी लेखनशैली वाचकांना अंतर्मुख करते. कोकरे हे वास्तवदर्शी लेखक असून समाजातील गरिबी, बेरोजगारी, दुर्बल, उपेक्षित घटकांचे जीवनदर्शन त्यांच्या साहित्यात घडते. त्यांचे लेखन हे सामाजिक प्रश्नांना थेट भिडणारे, त्यावर परखड भाष्य करणारे असते. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर कोकरे यांची शब्दांची आवड आणखी वाढत गेली. ‘मुंबई शहरावर लिहिलेल्या मराठी कवितांचा अभ्यास’ या विषयावर ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये पीएच. डी. करत आहेत. ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीला २०२२-२३ची ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर’ देण्यात आली होती. ‘माझा साहित्यिक प्रवास वृद्धिंगत राहण्यासाठी ही फेलोशीप माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे’ असे मत प्रदीप यांनी वेळोवेळी व्यक्त केले. जीवन आणि संस्कृती यांची सांगड घालत साहित्यविश्व जगणारे नव्या दमाचे अभ्यासक, लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. कोकरे यांना ‘कादंबरी’ या साहित्य प्रकारासाठी पहिला यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘ना. धों. महानोर पुरस्कार’ देण्यात आला होता.

Comments
Add Comment

‘एसटी’सुद्धा खासगीकरणाकडे?

मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रे गेल्या काही वर्षांत एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले. गेल्या ४५ वर्षांत फक्त ८

झाडे लावा, झाडे वाचवा

रवींद्र तांबे मनुष्याला आपले जीवन जगण्यासाठी मूलभूत गरजा दिल्या आहेत. त्यामुळे जे काय मनुष्याचे अस्तित्व आहे

‘फिनटेक’ उद्योग आणि नव्या उद्योग संधी

उदय पिंगळे ‘फिनटेक’ हा शब्द यापूर्वी बऱ्याचदा वाचनात अथवा कानावर अनेकदा आला असेल. हा शब्द फायनान्स आणि

कोकणात ‘कोकण सुवास’चा दरवळ...!

माझे कोकण : संतोष वायंगणकर कोकणात सध्या भातशेतीचा हंगाम सुरू आहे. पूर्वी कोकणातील सर्वच गावातून भातशेती मोठ्या

हुंडाबळी एक लज्जास्पद विकृती...

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे मुलींकडून हुंडा का मागितला जातो? याची मानसशास्त्रीय कारणे लक्षात घेणे

मुंबईत श्रीमंतांची संख्या वाढली

अल्पेश म्हात्रे गेल्या ११ वर्षांत, स्टार्टअप्स, विज्ञान, क्रीडा, सामुदायिक सेवा, संस्कृती आणि इतर विविध