
पहिलीपासून हिंदी मराठी विद्यार्थ्यांवर थोपणारा आदेश राज्य सरकारने रद्द केल्याची घोषणा केली आणि प्रादेशिक अस्मितेवरून आंदोलन करणाऱ्या शिवसेना उबाठा आणि राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाच्या आंदोलनातील हवा काढली गेली. हिंदी सक्तीचा करणारा शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी एकाच तीरात अनेक पक्ष्यी गारद केले आहेत. कारण मराठीच्या सक्तीच्या मुद्द्यावर शिवसेना उबाठा गट आणि राज ठाकरे यांचा मनसे हे एकत्र येऊ पाहत होते. त्यांनी संयुक्त आंदोलनाची घोषणाही केली होती. त्यामुळे अनेक पत्रकारांना राज आणि उद्धव एकत्र आले तर राज्यात पुन्हा आपले चांगले दिवस येतील आणि त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा आपले हितसंबंध जपता येतील अशी स्वप्ने पडू लागली होती. राज्यात मराठी सक्तीची आहेच आणि महायुती सरकारातील मुख्यमंत्री किंवा दादा भुसे यांनी वारंवार हे सांगितले होते. पण शिवसेना आणि मनसे यांना ही भाजपा सरकारला खिंडीत गाठण्याची संधी वाटली आणि त्यांनी आंदोलन जाहीर केले. पण काल विधिमंडळ अधिवेशनाच्या अगोदर एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी हिदी भाषा सक्तीचे परिपत्रक रद्द केल्याची घोषणा केली आणि उद्धव आणि राज यांच्या आंदोलनातील हवा काढून घेतली. आता त्यांच्या हातात दुसरे काही उरले नाही. आता ठाकरे बंधूंनी आम्ही उद्याचा दिवस विजय दिन म्हणून साजरा करणार आहोत असे सांगितले आहे. पण त्यातील हवा कधीच निघून गेली आहे.
वास्तविक २१ सप्टेंबर २०२१ रोजी ठाकरे सरकारनेच त्रिभाषा सूत्र धोरण स्वीकारले होते. पण आता ते आपल्याच निर्णयाच्या विरोधात आंदोलन करणार होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांना त्यांच्या निर्णयाच्या फोलपणाची जाणीव करून दिली आहे. आता आपली गेलेली अब्रू वाचवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येऊन सभा घेतील अशी घोषणा ठाकरे यांनी केली आहे, पण त्यात काही अर्थ नाही. कारण मुळातच या मुद्द्यातील हवा निघून गेल्यावर किती शिवसैनिक (ठाकरेंचे) येतील याची शंकाच आहे. राज यांच्या मनसेने तर अद्याप यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. खरे तर शिवसेना उबाठाची या संपूर्ण प्रकरणात चांगलीच फजिती झाली आहे. ‘गिरे तो भी टांग उपर’ या न्यायाने त्यांच्याकडून सध्याचा आव आणला जात आहे. हिंदी भाषेला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. पण मराठी ही मायभाषा आहे आणि ती सक्तीची आहेच आणि कोणतेही सरकार मराठी भाषेला राज्यातून नेस्तनाबूत करू शकणार नाही. हेच फडणवीस यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. पण समजून घ्यायचे नाही आणि आपलेच क्षुद्र अस्मितेचे राजकारण करत राहायचे याला सवंगलेले राजकीय पक्ष आपल्याच वळणावर जाणार यात काही शंका नाही, पण फडणवीस यांना ती संधीही मिळू नये याची दक्षता घेतलेली आहे. त्यामुळे राज आणि उद्धव यांच्यापुढे पुढे काय असा प्रश्न आहे. मराठी अस्मितेचे राजकारण करत शिवसेना (अविभाजित) सत्तेवर आली होती आणि राज्यात तिने चांगलेच यशही मिळवले. पण शिवसेना उबाठातील काही स्वार्थांध गटांना मराठी अस्मितेचे राजकारण करण्यातच रस होता. पण त्यांना या निवडणुकीत आणि देशपातळीवरही मतदारांनी चांगलाच धडा शिकवला. पण त्यातून धडा घेतील तर ते शिवसेना (उबाठा) कसले असा प्रश्न होता. अखेर फडणवीसांनी त्यांना त्याची जागा दाखवून दिली आणि आता हे दोघे बंधू किती जरी मराठीच्या अस्मितेचे राजकारणाचा विजय असे म्हणत असले तरीही ते तोंडघशी पडले आहेत हेच सिद्ध झाले. वास्तविक मराठी पहिलीपासून सक्तीची महाराष्ट्रात प्रथमपासून लागू आहे.
मराठी भाषेत शिक्षण दिले असता ते चांगल्या रितीने समजते असा त्यामागे युक्तिवाद केला जातो आणि विद्यार्थ्याला मराठीच नव्हे तर एकापेक्षा अधिक भाषा आल्या पाहिजेत म्हणून हिंदी शिकवले जाते. मुले मोठी झाल्यावर त्यांना हिंदी आणि त्यापेक्षा इंग्रजीत शिकवले नाही, तर ती मागे पडतील हा विचार यामागे होता. कोणत्याही सरकारचा विचार विद्यार्थ्यांचे कल्याण आणि त्याला सर्व भाषांचे शिक्षण मिळून तो जगात रोजगार मिळण्यास सक्षम व्हावा हाच असतो. पण ठाकरे आणि राज यांनी मराठी अस्मिता केंद्रस्थानी ठेवून या मुद्द्याचे राजकारण करण्याचा आणि भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला. विधानसभेत चांगलीच आपटी खाल्लेला पवारांचा राष्ट्रवादी गट आणि अन्य काही विरोधी पक्ष यात राजकारण करण्याची संधी आहे म्हणून या विषयावर एकत्र आले. शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाजी मारली आणि नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून त्रिभाषा सूत्र तपासेल आणि त्यांच्या अहवालावर पुढील निर्णय अवलंबून असेल. त्यामुळे महाराष्ट्राची एका अशा पर्वातून सुटका झाली आहे. कारण या मुद्द्याचे राजकारण किती दिवस चालेल हे सांगता येत नव्हते. अर्थातच उद्याचा मोर्चाही रद्द करण्यात आला आहे. दोन्ही ठाकरे बंधू हा आपला विजय असे समजत असतील तर हा त्यांचा भ्रम आहे. कारण मुळात हा मुद्दा नव्हताच. मुद्दा आहे तो विद्यार्थ्यांना वाचता येते की नाही आणि त्यात असर या संस्थेचा अहवाल जे सांगतो ते धक्कादायक आहे. या अहवालानुसार पाचवीतील विद्यार्थ्यांना मराठीतील काही शब्द वाचताही येत नाहीत आणि त्यांना मोठ्याने वाचणे तर दूरच, पण लिहिता येणे अवघड जाते. त्या बाबतीत ठाकरे बंधूंनी कधीही आंदोलन उभारल्याचे कधी आठवत नाही. केवळ राजकारणासाठी सोयीचे मुद्दे घ्यायचे आणि राजकारण करायचे यामुळे राज्याचा विकास कघीही होणार नाही. दोन दिवसांत या मुद्द्यावर ठाकरे गटाने भरपूर राजकारण करून घेतले. पण त्यांच्या भात्यातील बाण मुख्यमंत्र्यांनी काढून घेतला आहे आणि ते नुसतेच हाती रिकामेे धनुष्यबाण घेऊन गर्जना करत आहेत. याला हास्यास्पद विनोदी प्रयोग म्हणतात आणि तो ठाकरे खासकरून उद्धव ठाकरे राज्यात जास्त करत आहेत. त्यामुळे ठाकरे सत्तेवर तर येणारच नाहीत पण मुंबई महापालिका वाचवू शकणार नाहीत.