
मुंबईतील ५० जणांचा समावेश
उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे २०० पर्यटक अडकले असून यात ५० जण मुंबईतील आहे. केदारनाथ मार्गावरील भीम बाली येथे ही घटना घडली, ज्यामुळे मार्गाचा एक भाग खराब झाला.
यमुनोत्री इथे सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. ज्यात विविध राज्यातील अनेक यात्रेकरून अडकले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील २०० पर्यटकांचा समावेश आहे, ज्यातील ५० मुंबईतील असल्याची माहिती आहे. हवामान खात्याद्वारे उत्तराखंड मध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, अतिवृष्टीमुळे हजारो पर्यटक ठिक-ठिकाणी अडकून पडले आहेत. यमुनोत्री धाम रस्ता बंद करण्यात आला असून, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही .
चारधाम यात्रा विस्कळीत, यात्रेकरूंना तिथेच थांबण्याचे आवाहन
ढगफुटीमुळे तेहरी जिल्ह्यासारख्या इतर भागातही भूस्खलन झाले असून, त्यामुळे चार धाम यात्रा विस्कळीत झाली. बारकोट-यमुनोत्री रस्त्याला देखील याचा फटका बसला आहे, या रस्त्याचा काही भाग वाहून गेला. बद्रीनाथ महामार्ग आणि यमुनोत्री मार्गावर पुराच्या ढिगाऱ्यामुळे आणि रस्त्याच्या नुकसानीमुळे परिणाम झाला आहे, तर सिलई बंदजवळील प्रभावित रस्त्याच्या भागाची दुरुस्ती करण्यात आली आहे. रस्त्याचे इतर नुकसान झालेले भाग आणि वीज वाहिन्या दुरुस्त करण्याचे काम अधिकारी करत आहेत. या घटनेमुळे अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंना परिस्थिती सुधारेपर्यंत तिथेच थांबण्याचा आणि प्रवास टाळण्याचा सल्ला जारी केला आहे.
अनेक भागाचे अतोनात नुकसान
हिमाचल, उत्तराखंड या राज्यांमधील अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे, त्यामुळे त्या भागाचे अतोनात नुकसान झालं असून, अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत तर काही काही घरांमध्ये पाणी भरलं असून, काही ठिकाणी पत्त्याच्या बंगल्यासारखी घरं जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळते आहे.
अनेक अहवालांवरून असे दिसून आले आहे की, अडकलेल्या यात्रेकरूंना मदत करण्यासाठी आणि कचरा साफ करण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.