
मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही
मुंबई: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला हात पुढे केला आहे. उत्तराखंडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भुस्खलनात रस्ते बंद झाल्याने अनेक पर्यटक तिथे अडकून पडले आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण २०० पर्यटक अडकले असल्याची बातमी आहे. ज्यामध्ये तब्बल १५० पर्यटक हे मराठी आहेत. या मराठी पर्यटकांपर्यंत मदत पोहचवण्याची विनंती एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने नद्यांना प्रचंड पूर आला आहे. ज्यामुळे भूस्खलन होऊन वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत. ज्यामुळे हजारो पर्यटक या ठिकाणी गेले अनेक दिवस अडकून आहेत. ज्यात महाराष्ट्रातील पर्यंटकांचा देखील समावेश आहे. उत्तराखंडमधील यमुनोत्री धामच्या जानकीचट्टी गावात २८ जूनपासून सुमारे १५० मराठी पर्यटक अडकून पडले आहेत. त्यांच्या परतीच्या मार्गावर दरड कोसळून रस्ते वाहून गेल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून आठ दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला मदत करावी अशी मागणी मराठी पर्यटकांनी सरकारकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनातील आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत उत्तराखंड येथे अडकलेल्या आकाश जाधव या पर्यटकासोबत फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांची विचारपूस करून शक्य ती मदत त्यांच्यापर्यंत नक्की पोहचवली जाईल असे सांगून त्यांना धीर दिला. तसेच कोणतीही मदत लागल्यास आपल्याला संपर्क करावा असेही सांगितले.
यासोबतच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असलेल्या पराग दकाते यांच्याशी फोनवरून संवाद साधून या पर्यटकांना अन्न धान्य आणि आवश्यक ती मदत तातडीने पोहचवण्याची विनंती केली. याबाबत उत्तराखंड सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद देत शक्य तेवढ्या लवकर रस्ता पूर्ववत करून अडकलेल्या पर्यटकांपर्यंत मदत पोहचवण्यात येईल असे सांगितले. सध्या परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न उत्तराखंड सरकारकडून सुरू असून शक्य तितक्या लवकर महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांपर्यंत पोहचून त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था केली जाईल असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.