Tuesday, July 1, 2025

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू
मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत आहे. याप्रकरणी प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी विरोधकांनी केली. या मागणीला राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. ताकीद देऊनही प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. प्रदूषण केल्याप्रकरणी राज्यातील ३१८ उद्योगांना उत्पादन बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.

जल प्रदूषण प्रकरणी एका कंपनीवर नियमानुसार कारवाई झाली आहे. या कंपनीला १८ जून रोजी उद्योग बंद असा आदेश देण्यात आला आहे. आणखी काही कंपन्या जल प्रदूषण करत असल्यास त्यांच्यावरही नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. राज्यात विना परवानगी उद्योग करता येणार नाही. अनधिकृत उद्योगांना राज्यात थारा दिला जाणार नाही. पर्यावरणाशी संबंधित नियमांचे पालन करणाऱ्या कंपन्यांना राज्यात काम करता येईल. पण ज्या कंपन्या पर्यावरणाचा ऱ्हास रत असतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

ठाणे जिल्ह्यात १८८० कारखाने रेड झोन मध्ये आहेत आणि साठ पेक्षा जास्त कंपन्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहेत.नियमानुसार प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असे भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले. भातखळकरांनी हा मुद्दा मांडताच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली.
Comments
Add Comment